घरमहाराष्ट्रनाशिकसमृद्धी महामार्ग जोडरस्त्याच्या भूसंपादनास शेतकर्‍यांचा विरोध कायम

समृद्धी महामार्ग जोडरस्त्याच्या भूसंपादनास शेतकर्‍यांचा विरोध कायम

Subscribe

नांदूरवैद्य व साकूर येथे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह प्रमुख अधिकारी व शेतकर्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकर्‍यांचा विरोध कायम असल्याचे दिसून आले

इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोड रस्ता म्हणून समृद्धी-2 मार्गासाठी राज्य शासन पूर्व भागातील बेलगावकुर्‍हे, नांदूरवैद्य, कुर्‍हेगाव, अस्वली स्टेशन, साकूर, नांदगाव बु. गावातील बाग़ायती जमिनीचे संपादन करणार आहे.

प्रस्तावित प्रकल्पास तीव्र झालेला शेतकर्‍यांचा विरोध बघता त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी नांदूरवैद्य व साकूर येथे गुरुवार (दि. २३) रोजी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह प्रमुख अधिकारी व शेतकर्‍यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकर्‍यांचा विरोध कायम असल्याचे दिसून आले असले तरी शासकीय नियमानुसार कुठल्याही परिस्थितीत जमिनी शासन संपादीत करणार यावर देखील शिकामोर्तब झाले. त्यामुळे आगामी काळात शासन व शेतकर्‍यांत अधिकारी कसा समन्वय साधणार हे अधोरेखित झालेले दिसते.

- Advertisement -

तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास सात-आठ गावच्या सुमारे 163 गटातील शेकडो हेक्टर बागायती शेतजमिनी शासनाकड़ून संपादीत होणार आहेत. गतवर्षी केंद्र सरकाकडून मनमाड-इगतपुरी नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी येथील शेतकर्‍यांना नोटिसा प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनास शेतकर्‍यांकडून तीव्र विरोध झाला होता. याबाबतची प्रक्रिया सुरु असताना गेल्या 11 जून रोजी राज्य शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (राज्यमार्ग विशेष-2) साठी पूर्व भागातील जमिनी संपादीत करण्यासाठी अधिसूचना जारी झाली होती. त्यानंतर हरकती घेण्यासाठी दिलेल्या 21 दिवसांच्या मुदतीत अनेक शेतकर्‍यांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. तर अनेकांनी या भूसंपादन प्रक्रियेस विरोध देखील करत आमच्या जमिनी शाबूत राहू द्या असे सांगितले.

समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी पुन्हा एकदा जमिनी संपादित करण्याचा डाव शासन खेळत आहेत. आता उर्वरित जमिनी देखील शासन संपादीत करणार असल्याने यावेळी संतप्त प्रतिक्रिया जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे यांनी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासमोर मांडली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, समृद्धी महामार्गाचे अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोरसे, गोसावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरूण भोर, सरपंच अ‍ॅड.चंद्रसेन रोकडे, तलाठी सुवर्णा गांगुर्डे, तलाठी सुरेखा कदम, ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे, नंदू गुळवे, सुकदेव दिवटे उपस्थित होते.

समृद्धी महामार्गाच्या या जोडरस्त्यामुळे शेतकर्‍यांना भविष्यात याचा फायदाच होणार आहे. पुढील आठवड्यात जमिनींची शेतकर्‍यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात येईल त्यानंतर दर निश्चित केल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल.
                                                                      – तेजस चव्हाण, उपविभागीय अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -