Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक सटाण्यात राष्ट्रीय महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्तारोको

सटाण्यात राष्ट्रीय महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्तारोको

Subscribe

संतप्त शेतकर्‍यांनी राष्ट्रीय महामार्गावर केले रस्ता रोको आंदोलन.

सटाणा : महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावल्याने  संतप्त शेतकर्‍यांनी भाजपचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली  शुक्रवारी(दि.२६) राष्ट्रीय महामार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन छेडले.वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.  महावितरण कंपनीने शेतकर्‍यांचे थकीत विज बिल वसुली सुरू केली असून त्यासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर असलेले रोहीत्र बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार तालुक्यातील अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने  शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या कांदा लागवड सुरू असताना पाच-सहा तासही सलग विद्युत पुरवठा होत नाही. त्यातच महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली सुरू करुन शेतकर्‍यांच्या बांधावरील सर्व विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.त्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शुक्रवारी (दि.२६) राष्ट्रीय मार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या दिला.
आमदार दिलीप बोरसे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा आदींसह शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी पक्ष संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमवेत पुकारलेल्या या रास्तारोकोमुळे चौफुलीवरील चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. पोलीस निरीक्षक सुभाष अनमोल व अधिकारी कर्मचार्‍यांनी आंदोलनस्थळी दाखल होत बंदोबस्त तैनात ठेवला. यावेळी कुबेर जाधव, अभिमन पगार, सुभाष आहीरे, डॉ.विलास बच्छाव, बिंदूशेठ शर्मा, माणीक देवरे आदिंनी मनोगत व्यक्त करुन सक्तीची वीजबिल वसुली व विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध केला. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी निवेदन स्वीकारून आंदोलकांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष अनमोल वार्‍यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुकाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -