घरमहाराष्ट्रनाशिकसाहित्यसंमेलन: मुख्य मंडपासह सर्व तयारी ३० तारखेच्या आत पूर्ण करा

साहित्यसंमेलन: मुख्य मंडपासह सर्व तयारी ३० तारखेच्या आत पूर्ण करा

Subscribe

संमेलनस्थळी सुरू असलेल्या कामांची मंत्री छगन भुजबळांकडून पाहणी

नाशिक: कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्य सभामंडपा उभारणीच्या कामांची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली. यावेळी साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी ३० तारखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित व्यवस्थापकांना दिल्या.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी जर्मन पद्धतीचा मंडप घालण्यात येत असून अतिशय मजबूत स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येत आहे. अतिशय भव्य दिव्य असलेल्या या सोहळ्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे सर्व कामकाज ३० तारखेच्या आत पूर्ण करण्यात येणार असून साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर होणारे कार्यक्रम मुख्य स्टेजवर करण्यात येणार आहे. त्यातून सर्व तांत्रिक बाबींची तपासणी देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ते म्हणाले की, संपूर्ण नाशिकचा हा उत्सव असून बर्‍याच काळानंतर नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात नाशिक करांनी सहभागी होऊन उत्साहात सारस्वतांचे स्वागत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोर्‍हाडे, सुभाष पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  •   मुख्य दालनास कर्डक, बागूल यांचे नाव द्या : छात्रभारती

नाशिक: साहित्य संमेलनाच्या मुख्य दालनास कवी वामनदादा कर्डक व ज्येष्ठ लेखक बाबूराव बागूल यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

- Advertisement -

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व भारतीय संविधानाच्या मूल्यांचा जागर करण्यात वामनदादा कर्डक व बाबूराव बागूल यांचे मोठे योगेदान आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात त्यांचा विसर पडता कामा नये. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व मुख्य दालनास त्यांची नावे द्यावीत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष राकेश पवार, उपाध्यक्ष समाधान बागूल व शहराध्यक्ष देविदास हजारे उपस्थित होते.

  • कालिदास कलामंदिरात आज विज्ञानावर परिसंवाद

नाशिक: साहित्य संमेलन आयोजन समिती, लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजता कालिदास कलामंदिर, शालिमार येथे मराठी विज्ञान साहित्य : परंपरा, सामाजिक संदर्भ आणि महत्व या विषयावर संमेलनपूर्व परिसंवाद होणार आहे. परिसंवादात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे, पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. संजय ढोले सहभागी होणार आहेत.

  • ‘देशाचे भविष्य राज्यघटनेवर’

नाशिक: देशाचे भविष्य राज्यघटनेवर अवलंबून असून, संविधान समजून न घेतल्यास माणसाला भविष्याची मांडणी कधीच करता येणार नाही. माणसाचे अज्ञान व त्याविषयीची अनास्था हे त्याचे शत्रू आहेत. परिणामी त्याची पिळवणूक वाढत चालली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती आयोजित संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ‘संविधान विषयक परिसंवाद’मध्ये गुरूवारी (दि.२५) महाकवी कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कांबळे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होवूनही भारतून गुलामी संपलेली नाही. देशातील नागरिकांना आपण देशाचे मालक आहोत हेच मुळात कळले नसून नागरिक माय बाप सरकार म्हणून सरकारकडे विनवणी करताना दिसतात. यावेळी स्वागत समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, भगवान हिरे उपस्थित होते.

पत्रिकेतून कवी कट्टा समितीप्रमुख, परिसंवाद सूत्रधाराचे नाव गायब

नाशिक: साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेतून कवी कट्टा समितीचे प्रमुख संतोष वाटपाडे व परिसंवादाचे सूत्रधार दत्ता पाटील यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाटपाडे यांनी आयोजकांकडे पत्र देत विचारणा केली आहे. त्यामुळे आयोजकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता होणार्‍या मराठी नाटक : एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, कार्यक्रम पत्रिकेतून त्यांचे नाव गायब करण्यात आले आहे. तर कवी कट्टा समितीचे प्रमुख वाटपाडे यांनी शेकडो कवींशी संपर्क साधत कवी कट्ट्याचे नियोजन केले आहे. पण त्यांचे नाव पत्रिकेतून वगळले. आयोजकांनी मर्जीतील लोकांची नावेच पत्रिकेत घेतल्याचे वाटपाडे यांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -