जिल्ह्यात पाच लाख ‘आयुष्यमान’

गोल्डन कार्ड वितरणात राज्यात प्रथम क्रमांक; आरोग्य विभागातील ‘आशां’वर जबाबदारी

ayushman bharat

आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकांना खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीचा हात म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेत नाशिक जिल्ह्यातील पाच लाख कुटुंब पात्र ठरले आहेत. आरोग्य विभागाच्या आशा कर्मचार्‍यांमार्फत पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप केले जात आहे. गोल्डन कार्ड वितरणात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

आर्थिक व सामाजिक मागास कुटुंबियांसाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना राबवली जाते. पात्र लाभार्थी कुटुंबियांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. यापूर्वी अस्तित्वात असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजनेत लाभार्थ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते. या योजनेची व्याप्ती वाढवून आता पाच लाख रुपये केली आहे. विशेष म्हणजे केवळ शासकीय रुग्णालयांमध्येच नव्हे तर खासगी रुग्णालयात देखील मोफत उपचार घेता येतील. त्याचबरोबर विविध प्रकारच्या एक हजार 150 आजारांवर लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रियाही करण्यात येत आहे.

जुलै 2019 अखेर जिल्ह्यातील एक लाख 3२ हजार कुटुंबांना सिल्व्हर कार्ड आणि एक लाख 31 हजार कुटुंबांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आशा कर्मचार्‍यांमार्फत हे कार्ड वितरीत केले जात आहेत. या कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणींचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी घेतला. निफाडमध्ये 22 हजार, दिंडोरीत 17 हजार आणि मालेगाव तालुक्यात 15 हजार गोल्डन कार्ड वितरीत केले आहेत. त्याचप्रमाणे सिल्व्हर कार्ड वितरणात नाशिक तालुका प्रथम क्रमांकावर आहे.

येथे मिळवा गोल्डन कार्ड

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर अथवा सरकारी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा. ज्या व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट आहेत, त्यांनी गोल्डन कार्ड मिळवून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

तालुकानिहाय लाभार्थी

 • नाशिक- 23,384
 • निफाड- 21,207
 • दिंडोरी- 16,173
 • मालेगाव- 14,614
 • चांदवड-9,754
 • नांदगाव- 8053
 • बागलाण- 7,274
 • येवला- 6,349
 • सिन्नर- 5,873
 • देवळा- 5,307
 • इगतपुरी- 5,170
 • त्र्यंबकेश्वर- 4,432
 • सुरगाणा- 1,624
 • कळवण- 733
 • पेठ- 324