घरमहाराष्ट्रनाशिकस्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहोचणार अंधारलेल्या आदिवासी वस्तीत वीज

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहोचणार अंधारलेल्या आदिवासी वस्तीत वीज

Subscribe

पिंपळगावच्या आदिवासींचे जीवन केदा आहेरांच्या प्रयत्नाने होणार प्रकाशित

देवळा : हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, समोर लॅपटॉप, एसी रुम अशा सोयीसुविधांमध्ये जगणारी जनता घरात साधा दिवाही नसलेल्या आदिवासींचे दु:ख कसे समजू शकणार? किंबहुना अशी परिस्थिती असते, यावर विश्वास ठेवणेच या नागरिकांसाठी कठीण आहे, मात्र हे सत्य आहे. तालुक्यापासून अवघ्या काही अंतरावरील पिंपळगाव (वा.) येथील वनजमीन हक्कधारक आदिवासी वस्तीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही विजेअभावी अंधारात होते.

मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर तेथे वीज जोडणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच वीजपुरवठा सुरू होणार असल्याने वस्तीत उजेड अन् आदिवासींचे जीवनही प्रकाशमान होणार आहे. रविवारी (दि. ३०) या वस्तीत विद्युतीकरण कामाचे उद्घाटन केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आल्याने वस्तीत राहणार्‍या नागरिकांनी केदा आहेरांना धन्यवाद देत आनंदोत्सव साजरा केला.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही येथील आदिवासी वस्ती वीजजोडणीपासून कोसो दूर होती. आदिवासींच्या वस्तीवरील अंधार नेमका कधी दूर होईल? हा मोठा प्रश्न भेडसावत होता. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या सततच्या पाठपुरावा आणि प्रयत्नामुळे अनेक वर्षांपासून विजेअभावी अंधारात राहिलेल्या या वस्तीला अखेर वीज मिळणार असून, या आदिवासी वस्तीतील अंधार लवकरच मिटणार आहे. वस्तीवर जीवन जगणार्‍या नागरिकांना प्रथमच घराघरांत वीज पोहोचणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर केदा आहेर यांच्या सततच्या पाठपुराव्याने आदिवासी समाजातील नागरिकांचे जीवन प्रकाशाने उजळून निघणार आहे.

रविवारी नुकतेच वस्ती विद्युतीकरण कामाचे उद्घाटन केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक समाज बांधवांनी आपआपल्या घरासमोर प्रत्येकी एक वडाचे झाड लावावे, जेणेकरून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे आहेर यांनी सांगितले. यावेळी महंत गणेशागिरीनंद देवदारेश्वर, उपसरपंच भाऊसाहेब पगार, नदीश थोरात, महावितरणचे सहाय्यक अभियंता आर.आर. खाडे, सतीश बच्छाव, विद्युत कर्मचारी सागर आहेर, प्रमोद ठाकरे, समाधान सोनजे, महेंद्र पाटील, भाऊसाहेब बागुल, रवींद्र बागुल, समाधान जाधव, हनुमंत जाधव, नामदेव जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

अंधारलेल्या आदिवासी वस्तीत घरोघरी लवकरच वीज पोहोचणार असून भविष्यातील मुलभूत गरजा, रस्ते, पिण्यास शुद्ध पाणी, शिक्षणासाठी शाळा, अंगणवाडी, आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. – केदा आहेर, जिल्हाध्यक्ष भाजप

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -