पालिकेच्या खतप्रकल्पात प्लास्टिकपासून इंधन; काय आहे ‘बॅलेस्टिक सेपरेटर’ व ‘प्लास्टिक टू फ्युएल’ संच ?

नाशिक : शहरातून जमा होणार्‍या कचर्‍यावर अधिकाधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यादृष्टीने कचरा वर्गीकरण अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात सद्यस्थितीत ट्रोमेलद्वारे वर्गीकरण केले जाते. परंतु, हे काम अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी २५० मेट्रीक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलेस्टिक सेपरेटर संच उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात प्लास्टिकपासून इंधन तयार केले जाणार असून यामुळे प्लास्टिक कचर्‍याचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

खत प्रकल्पात सुक्या कचर्‍याचे तीन ते चार प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्यापासून उच्च प्रतीचे आरडीएफ तयार करणे शक्य होणार आहे. तसेच, दैनंदिन कचर्‍यात प्लास्टिकचे वाढते प्रमाण पाहता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधन तयार करणे शक्य आहे. त्यादृष्टीने या केंद्रात पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फ्युएल’ या संयत्राची उभारणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत ही दोन्ही संयंत्र बुधवारी (दि.३) कार्यान्वित करण्यात आली. यामुळे शहरातील दैनंदिन कचर्‍यावर प्रभावीपणे प्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावण्याचे काम शक्य होणार आहे.

महापालिकेने २००१ पासून घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रात २००१ मध्ये ओल्या कचर्‍यापासून खत तयार करण्याचा ३०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यानंतर २००८-०९ मध्ये त्यात वाढ करून प्रकल्पाची क्षमता पाचशे मेट्रिक टन प्रतिदिन इतकी वाढवण्यात आली.

या केंद्रात जळाऊ कचर्‍यापासून आरडीएफ तयार करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला. प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) बाजीराव माळी, नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक कर्नल सुरेश रेगे, उपमहाव्यवस्थापक मयुरेश अमराळे, उपअभियंता (यांत्रिकी) सुनील खैरनार, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

घनकचरा प्रकल्पातील उत्पादने

या केंद्रात ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती, सुक्या कचर्‍यापासून आरडीएफ निर्मिती, गार्डन वेस्ट व पालापाचोळ्यापासून ब्रिकेट तयार करणे, प्लास्टिक पासून प्लास्टिक दाणे तयार करणे, कचर्‍यातील लीचेटवर प्रक्रिया करणे, मृत जनावरे शवदाहीनी, सायंटिफिक लँडफील, जुन्या लँडफीलचे सायंटिफिक कॅपिंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.