सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

कारमधून करायचे चेनस्नॅचिंग

The thieves snatched the gold chain of actress Savita Malpekar

पंचवटी : म्हसरुळ, आडगावसह पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवल्याच्या घटना अनेकदा घडल्या. मात्र नुकत्याच घडलेल्या घटनेत कारमधून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याने पोलिसांपुपढे आव्हान उभे ठाकले होते. या आव्हानाला जशास तसे उत्तर देत पोलिसांनी या प्रकरणातील सोनसाखळी चोरट्यांच्या तातडीने मुसक्या आवळल्या.

याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी सुमन नारायण सोमवंशी (वय ६५, रा. श्री स्वामी समर्थ बंगला, मखमलाबाद रोड, पंचवटी) या रविवारी सकाळी नातवाला मखमलाबाद रोडवरून क्लासमध्ये सोडण्यासाठी आल्या होत्या. नातवाला क्लासला सोडून त्या घरी जात असताना त्यांच्याजवळ एक कार येऊन थांबली. आरोपींपैकी एकाने कारमधून उतरून सोमवंशी यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून खेचून नेले. या घटनेने भांबावलेल्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला; पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी सोमवंशी यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक साखरे व पथकाने धाव घेतली आणि समोरील बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. यात गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाचे चारचाकी वाहन घटनास्थळाजवळील रस्त्याने जाताना दिसले. त्याचा पाठलाग केला असता संशयित चारचाकी पोलीस अंबादास जाधव यांनी अडवून संशयित जयसिंग हरीराम यादव (वय २५), पंकज परशुराम यादव (वय २०), कुलदीप भगवानदीप यादव (वय २०) संदीप उमाशंकर यादव (वय २८, सर्व रा. सिल्व्हासा, जि. बलसाड, गुजरात) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरीस गेले एक लाख रूपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली नंबरप्लेट नसलेली चारचाकी रेनॉल्ट क्विड (मूळ क्रमांक जीजे १५ सीके ९१८५) देखील ताब्यात घेण्यात आली.