घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिडकोत पुन्हा उफाळला 'गुंडाराज'; खुलेआम कोयते, दंडुके नाचवत वाहनांची तोडफोड, धुमाकूळ

सिडकोत पुन्हा उफाळला ‘गुंडाराज’; खुलेआम कोयते, दंडुके नाचवत वाहनांची तोडफोड, धुमाकूळ

Subscribe

नाशिक : येथील पवननगर परिसरातील सूर्यनारायण चौकात शुक्रवारी (दि.२६) रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान दोन दुचाकींवरून आलेल्या गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते व लाकडी दांडके नाचवत दहशत माजविली. यावेळी गुंडांनी तीन ते चार रिक्षांसह १५ ते २० दुचाकींच्या काचा, आरसे फोडत नुकसान केले. या घटनेमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सक्षम अधिकार्‍यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन नाशिक परिसरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गुंडांची दहशत कायम असल्यामुळे भविष्यात अधिक त्रास होईल या भीतीने वाहनमालकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार देण्यात आला. यावरून नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास राहिला नसल्याचे तसेच गुंडांची दहशत अधिक असल्याचे निष्पन्न होत आहे. या परिसरात वारंवार गुंडांकडून वाहनांची तोडफोड आणि मारहाण करून दहशत माजवली जात असल्याने पोलिसांनी गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

गुंडांना अटक करुन नागरिकांना आश्वस्त करा

पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून शहरभरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच, खासगी आस्थापनांमध्येदेखील ही यंत्रणा आहे. या फुटेजच्या आधारे धुमाकूळ घालणार्‍या गुंडांना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

वरदहस्त कोणाचा?

सिडको परिसरात चौकाचौकात टपोरी प्रवृत्तीच्या युवकांच टोळक सतत वावरत असत. त्यांच्याकडून अनेकदा मारामारी, हल्ले, छेडछाड अश्या प्रकारचे कृत्य घडत असते. कोणी याबाबत तक्रार केली किंवा हटकले तर त्या सामान्य नागरिकालाही त्रास दिला जातो. पोलिसांत तक्रार दिली की तात्पुरत्या स्वरूपात कारवाई होते. मात्र, या टोळक्यांवर वरदहस्त असलेला ‘गब्बर’ व्यक्ति त्यांना सोडवण्याची तजबीज करतो. यामुळे या टोळक्यांच मनोधैर्य अधिकच वाढते. याच कारणास्तव, या टोळक्यांवर वरदहस्त असलेल्यावरही पोलिसांनी वॉच ठेवावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -