घरताज्या घडामोडीफलज्योतिष समर्थक मंत्र्यांमुळे समाजाची वैज्ञानिक पातळी खालावली, डॉ. जयंत नारळीकर यांचा हल्लाबोल

फलज्योतिष समर्थक मंत्र्यांमुळे समाजाची वैज्ञानिक पातळी खालावली, डॉ. जयंत नारळीकर यांचा हल्लाबोल

Subscribe

विज्ञानाची शाखा म्हणवून घेऊ इच्छिणार्‍या विषयाला काही कसोट्यांवर उत्तीर्ण व्हावे लागते. त्या कसोट्या फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यांत तो विषय अनुत्तीर्ण ठरतो. हे अनेक प्रयोगांती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणे देतात यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे याची जाणीव होते, अशा शब्दात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी टिकाकारांवर हल्लाबोल केला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य’ या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच हेलिकॉप्टर आणण्यासारखी नैसर्गिक परिस्थिती नसल्यामुळे डॉ. नारळीकर यांनी संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन पद्धतीने भाषण केले.

नाशिकमध्ये साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. अध्यक्षीय भाषणात डॉ. नारळीकर म्हणाले की, खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते. ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. वर्षभर सगळ्या जगात कोविडच्या व्हायरसने थैमान घातले आणि बरेच नुकसान केले. एक प्रकारे आपण विज्ञानकथेत वर्णन केलेली स्थिती अनुभवत आहोत. वैज्ञानिक मार्गाने वैद्यकीय लस शोधणे हाच सर्वमान्य उपाय ठरला. कोणत्याही धर्माची कर्मकांडे, फलज्योतिष यांचा उपयोग झाला नाही.

- Advertisement -

सर्वसामान्य माणसांची (अर्थात भारतातील) एक अशी गोड गैरसमजूत आहे की, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते वेदादी करून पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्ठ्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडायला पाहिजे. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे, दूरदृष्टी इत्यादींची उदाहरणे पुराणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत, ज्याला आपण गणितीय विज्ञान वाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत. अपोलो ११ ह्या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले. अशीच चंद्रावरच्या स्वारीतील हकिगत जूल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते.

समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर ह्या दोन स्वार्‍यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही. परंतु जर अधिक खोलात शिरलो तर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून अपोलो ११ चे यान कसे तयार केले, त्याची एकंदर यात्रा कशी आखली गेली, अंतराळवीरांना कुठल्या कुठल्या चाचण्यांतून जावे लागले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. ह्या दुसर्‍या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळयात्रा आखता येईल. पुराणातील वर्णने फार तर पहिल्या प्रकारची आहेत, दुसर्‍या प्रकारची नाहीत.

- Advertisement -

पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही. वायव्यास्त्र, अग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते याची कृती महाभारतात सापडत नाही. सध्या उपलब्ध पौराणिक वाङ्मयातून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहिणार्‍यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. हा पुरावा का उपलब्ध नाही? याचे कारण बर्‍याच वेळा असे सांगण्यात येते की, आपल्या पूर्वजांनी ती माहिती सांकेतिक भाषेत लिहून ठेवली आहे किंवा ती माहिती नष्ट झाली. अर्थात अशी विधाने तपासून पाहता येत नसल्याने त्यांचे वैज्ञानिक तपासणीत काही महत्व राहत नाही. तो केवळ ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न उरतो. तसेच असे विधान जर कोणी केले, जर पुराणात ही वर्णने आहेत तर ती कल्पनाशक्ती निर्माण व्हायला खरी वस्तूस्थिती तशी नसणार काय? तर त्या विधानाला उत्तर म्हणून असे म्हणता येईल. त्या विधानांप्रमाणेच ‘स्टार वॉर्स’ सारखे चित्रपट तशी संस्कृती पृथ्वीवर आहे, असे सांगतात. वास्तविक हे चित्रपट पूर्णतः काल्पनिक असून त्यातील वैज्ञानिक भाग जवळ जवळ शून्य आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले.

संमेलनाची आखणी करताना राजाश्रय हवा,  राजकारण्यांचा सहभाग का नको?

साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजेे. साहित्यिक मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबर्‍या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढार्‍यांइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. संमेलनाची आखणी करताना राजाश्रय हवा मग राजकारण्यांचा सहभाग का नको, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी साहित्य संमेलनात राजकारण्यांच्या सहभागावर भाष्य केले. शरद पवारांची भाषणे राजकीय स्वरुपाची नसतात, असे सांगून त्यांनी पवारांचीही पाठराखण केली.

साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर राजकारण्यांना स्थान असू नये, असा सूर काही वर्षांपासून आळवण्यात येत आहे. नाशिकमध्ये सुरू झालेल्या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात भुजबळ यांनी या विषयाला हात घातला. ते म्हणाले, साहित्यिकांनी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चुकता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेला सोहळा आहे. त्याला सारस्वतांचा मेळा म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. साहित्य संमेलनात राजकारण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. १९४२ च्या साहित्य संमेलनात ‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’ याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १९६० सालीच साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन, ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचे आपण जाणतो. आमचे नेते शरद पवार हे स्वतः अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले आहेत. आतापर्यंत चार संमेलनांचे उद्घाटन त्यांनी केले आहे. त्यांची भाषणे साहित्य मंचावर कधीच राजकीय स्वरूपाची नसतात. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केवळ राजकीय चर्चा केली नाही तर मराठी साहित्यातील रससिद्धांतावर त्यांनी भाष्य केले होते. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन, असेही भुजबळ यांनी सांगितले.


हेही वाचा :  डॉ. नारळीकरांऐवजी संमेलनाला हिंडता-फिरता अध्यक्ष निवडला असता

फलज्योतिष समर्थक मंत्र्यांमुळे समाजाची वैज्ञानिक पातळी खालावली, डॉ. जयंत नारळीकर यांचा हल्लाबोल
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -