घरमहाराष्ट्रनाशिकखोतकरांकडून कोकाटेंची भेट; आघाडीची पवारांना गळ

खोतकरांकडून कोकाटेंची भेट; आघाडीची पवारांना गळ

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माघारीसाठी पडद्यामागून मोठेच नाट्य घडल्याचे शुक्रवारी १२ एप्रिलला दिसून आले.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माघारीसाठी पडद्यामागून मोठेच नाट्य घडल्याचे शुक्रवारी १२ एप्रिलला दिसून आले. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एका खासगी हॉटेलमध्ये बोलवून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना माघारीसाठी गळ घातली. मात्र, प्रचारात आपण खूपच पुढे गेल्याचे सांगत कोकाटे यांनी माघारीस स्पष्ट शब्दात नकार दिला. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्याही माघारीसाठी आघाडीकडून प्रयत्न झाल्याचे समजते. ‘मी आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवेलच, असे सुनावत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अपक्ष करण गायकर यांच्या माघारीसाठी खोतकर यांची शिष्टाई यशस्वी ठरली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत असल्याने अनेकांचे लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागून होते. प्रत्यक्षात तेथे फारशा राजकीय हालचाली दिसूनच आल्या नाहीत. पडद्यामागून मोठ्याच हालचाली झाल्याचे सूत्रांकडून समजते. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीने युतीच्या उमेदवाराच्या मतांचे ध्रुवीकरण होईल, असे बोलले जाते. त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचे निकटचे स्नेही अर्जुन खोतकर यांनी मध्यस्ती करीत त्यांना माघारीसाठी गळ घालण्यात आली. चांडक सर्कल परिसरातील एसएसके हॉटेलमध्ये कोकाटे आणि खोतकर यांची भेट झाली. मात्र, आपण प्रचारात खूपच पुढे गेलो असून विजयाचेही चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे मतदारांसाठी मी माघार घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोबाइलवर कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. कोकाटे भूमिकेवर ठाम राहिले. दुसरीकडे खोतकर यांनी गायकवरांच्या माघारीसाठी शिष्टाई केली. गायकर आणि खोतकर यांचे निकटचे संबंध असल्याचा फायदा युतीने उचलला. मतांचे विभाजन होण्यापेक्षा युतीच्या गोटातून भविष्यात चांगली संधी मिळेल, अशी ग्वाही देत खोतकरांनी गायकरांना माघार घेण्याची यशस्वी चाल खेळल्याचे बोलले जाते. मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण माघार घेतली असून भविष्यातील कोणतेही आश्वासन घेतले नाही, असे गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

एकीकडे शिवसेना-भाजप युतीकडून अपक्षांच्या माघारीसाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. या वृत्तास पवार यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दुजोरा दिला. पवार हे एकेकाळचे भुजबळ यांचेच कार्यकर्ते असल्याने ते माघार घेऊ शकतात, असा कयास लावला जात होता. मात्र, ‘आपण आंबेडकर यांचे कार्यकर्ते असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असे त्यांनी सुनावल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

माकप उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाशिक मतदारसंघातून अपक्ष आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांना माघारीसाठी गळ घातली असताना दुसरीकडे दिंडोरी मतदार संघातील उमेदवारांच्या माघारीसाठी मात्र फारशा हालचाली झाल्या नसल्याचे कळते. माकपचे उमेदवार आमदार जीवा पांडू गावित यांच्या उमेदवारीने आघाडीच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, असे बोलले जाते. त्यामुळे आघाडीच्या वतीने गावित यांना माघार घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, गावितांनी तो फेटाळून लावल्याचे वृत्त आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -