घरमहाराष्ट्रनाशिकआडगाव येथे आढळला मृत बिबट्या

आडगाव येथे आढळला मृत बिबट्या

Subscribe

पंचवटीच्या आडगाव येथील नेत्रावती नदीपात्रात मंगळवार, २२ जानेवारीला पहाटेच्या सुमारास बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याला ठार मारले असावे, अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली असली तरी, वाहनाच्या अपघातानंतर झालेली जखम आणि डोक्याला लागलेला गंभीर मार यामुळे इन्फेक्शन होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर वनविभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

आडगाव भागात मळे परिसर, तसेच पाण्याची उपलब्धता असल्याने या भागात नेहमीच बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अचानक वाहनासमोर आल्याने अपघात झाला. त्यानंतर दुखापत झालेला हा बिबट्या याच भागात फिरत राहिला. मात्र, शरीरातील इन्फेक्शन वाढल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पहाटेच्या सुमारास ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस आणि वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बिबट्याचे शव ताब्यात घेतले. या वेळी त्याची सर्व नखे, मिशा शाबूत आढळून आल्या. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूमागे घातपात नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leopard_Pvt1
बिबट्याच्या पाठीलाही गंभीर दुखापत झाली

ठार मारल्याचीही चर्चा

घटनास्थळी उपस्थित काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या बिबट्याला त्याच्या कातडीसाठी ठार मारले असावे, अशीही चर्चा होती. मात्र, पाठीचा थोडा भाग वगळता बिबट्याची अन्य कातडी मात्र तशीच होती. त्यामुळे वाहनाच्या अपघातात घसरत गेल्याने कातडी निघाली आणि गंभीर दुखापतीमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचीच शक्यता अधिक आहे.

- Advertisement -

घातपात नव्हे, इन्फेक्शन

बिबट्याचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार नाही. वाहन अपघातात त्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या. त्यातून इन्फेक्शन होऊन बिबट्याचा मृत्यू झाला. त्याच्या जांघेतदेखील जखम आढळून आली आहे. १५ दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत त्याला दुखापत झाली असावी. – रवी सोनार, वनपरिमंडळ अधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -