५ कोटींचे कर्ज मिळवण्याच्या नादात साडेदहा लाख गमावले; ‘प्रोसेसिंग-फी’च्या नावाखाली फसवणूक

नाशिक : पाच कोटी रुपयाचे दीर्घ मुदतीचे व कमी व्याजदराने कर्ज काढून देतो असे सांगत चार जणांनी एका युवकाची प्रोसेसिंग फीच्या नावाने तब्बल १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुक्लेश्वर बजाबा वर्पे (वय ४५, रा. समर्थनगर, इंदिरानगर) इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनोज वामन शिंदे(वय ४५), सर्वेश मनोज शिंदे (वय ३५, रा. महात्मानगर, नाशिक), युवराज हरीश कुमार वर्मा, सरताज मिर्झा( वय४७ रा. अंधेरी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगरमधील शुक्लेश्वर बजाबा वर्पे यांना कंपनीच्या कामासाठी पाच कोटी रुपये कमी व्याज दराने व दीर्घ मुदतीचे कर्ज काढून देतो, अशी बतावणी केली. यात संशयित आरोपी मनोज वामन शिंदे, सर्वेश मनोज शिंदे, युवराज हरीश कुमार वर्मा, सरताज मिर्झा यांनी १ जानेवारी २०२१ ते १७ मे २०२३ या कालवधीत वर्पे यांच्याकडून दीर्घ मुदतीचे व कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. यावेळी संशयितांनी वर्पे यांना कर्जासाठी प्रोसेसिंग फी देण्याचे सांगितले.

यावेळी वर्पे यांच्याकडून कर्जासाठी तब्बल १० लाख ५० हजार रूपयांची प्रोसेसिंग फी संशयितांनी घेतली. मात्र, कर्ज काही मिळाले नाही, या प्रकरणात वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणूक झाल्याप्रकरणी पाचही संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.