घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमनमाड : रामगुळणा, पांझण नद्यांना पूर

मनमाड : रामगुळणा, पांझण नद्यांना पूर

Subscribe

मनमाड : मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसरात जोर धरला असून रविवारी दुपारपासून सुरु झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरु होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर येऊन त्यांनी रौद्ररूप धारण केले. पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांसोबत दुकानात शिरले तर शिवाजी नगर, ईदगाह, कॉलेज रोड, टकार मोहल्ला या भागातील सर्व पूल पाण्याखाली गेल्यामुळे एकप्रकारे या सर्व भागांचा शहराशी असलेला संपर्क तुटला होता. गेल्या 30 वर्षांनंतर दोन्ही नद्यांना इतका मोठा पूर आल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले. एका आठवड्यात सलग दुसर्‍यांदा नद्यांना पूर येऊन त्याचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पालिका प्रशासनातर्फे खबरदरीचा उपाय म्हणून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर पूरग्रस्तांसाठी गुरुद्वारात राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सलग होत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्याना पूर आला असला तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात अधून-मधून रोज पाऊस पडत होता. रविवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊन हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. पावसाचा जोर इतका होता कि शहरातून वाहणार्‍या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. नेहमीप्रमाणे पुराचे पाणी सर्वात प्रथम गुरुद्वाराच्या मागे असलेल्या नदीकाठच्या घरांत शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. तिकडे या भागातील तीन, आययुडीपी भागातील एक आणि बुरकूलवाडी भागातील एक असे पाच पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला होता. पावसाचा सर्वात जास्त फटका विवेकानंद नगर, आययुडीपी, गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा, ईदगाह आणि टकार मोहल्ला या भागाना बसला.दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे पाहून पालिका प्रशासन अलर्ट झाले. मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यानी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.ड्रेनेजची व्यवस्था चांगली नसल्यामुळे सर्वच रस्त्यावर गुडग्या एव्हडे पाणी साचून रस्ते जलमय झाले होते तर सखल भागात देखील पाणी साचले होते. मोठे पूर आले असले तरी सुदैवाने जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -