घरमहाराष्ट्रनाशिकविनानोंदणी वर्षभर धावल्या कित्येक दुचाकी

विनानोंदणी वर्षभर धावल्या कित्येक दुचाकी

Subscribe

वाहतूक पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी वाहन व कागदपत्रांची तपासणी केली जात असली, तरी तब्बल दीड वर्ष असंख्य दुचाकी विनानोंदणी धावल्याचे गंभीर वास्तव उजेडात आले आहे.

वाहतूक पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी वाहन व कागदपत्रांची तपासणी केली जात असली, तरी तब्बल दीड वर्ष असंख्य दुचाकी विनानोंदणी धावल्याचे गंभीर वास्तव उजेडात आले आहे. येथील एका शोरूमच्या मॅनेजरने आर्थिक घोटाळा करून ग्राहकांकडून पैसे घेत वाहनांचा ताबा दिला खरा, परंतू त्यांच्या दुचाकींचे रजिस्ट्रेशन न करताच फरार झाल्याने ग्राहकांना नाईलाजास्तव विनानोंदणी दुचाकीचाच वापर करावा लागल्याचा प्रकार घडला आहे. अखेर यातील एका दुचाकीचालकाने पैसे भरणा करूनही शोरूम रजिस्ट्रेशन करत नसल्याची तक्रार पोलिसांत दिल्यावर कंपनीने शोरूम मालकाला सर्व रक्कम तातडीने भरण्यास सांगितल्यावर या दुचाकींच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आरटीओ विभागाकडून करण्यात आली.

उपनगर परिसरातील आराध्या आटो प्रा. लिमिटेड या नावाने सुरू असलेल्या सुझुकी कंपनीच्या शोरूममधील व्यवस्थापक फरहान नायर याने नोव्हेंबर २०१७ पासून ५ आक्टोबर २०१८ पर्यंत शोरूमच्या खात्यावर गाड्यांचे पैसे जमा करताना ग्राहकांना पेटीएमवरून पैसे भरल्यास पाच हजारांची सूट असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून रोख रक्कम स्विकारून ग्राहकांच्या बुकिंग फॉर्मवर खोट्या पेटीएमची नोंद करत ती रक्कम खिशात घातली, अशी तक्रार शोरूम मालकाने उपनगर पोलिसांत दिली. दरम्यान शोरूम मालकाचे वडील आजारी असल्याने सर्व आर्थिक व्यवहार नायर पाहात होता. नायर दुबईला जाण्याचे कारण सांगत मालकाला हिशोब न देता कामावर येण्यास टाळाटाळ करत होता व अखेर तो फरार झाला. शंका आल्याने मालकाने चौकशी करत उपनगर पोलिसांत ६० हजार रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार ३० नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केली. त्यावरून अनेक दुचाकींचे रजिस्ट्रेशनचे पैसेच भरले नसल्याचे समोर आले. दरम्यान ३० मार्च २०१९ ला येथील एका ग्राहकाने उपनगर पोलिसांत शोरूमच्या विरोधात रजिस्ट्रेशन करून देत नसल्याबाबत सुभाष जवरीलाल नहार (रा. मुक्तीधामच्या मागे, नाशिकरोड) यांनी ११ जुलै २०१७ रोजी तक्रार दिली. सुझुकी एक्सेस १२५ सीसी ही गाडी खरेदी केली, त्याबदल्यात शोरूमला ६७,७१५ रुपये भरले. त्यात सर्व प्रकारचे कर समाविष्ट होते, असे तक्रारीत म्हटले होते. यानुसार कारवाई होऊन संबंधीत गुन्हा हा शोरूम मालकावर न होता कंपनीवर दाखल होणार असल्याचे सांगण्यात आल्यावर घाबरून शोरूम मालकानेच उर्वरीत सर्वच दुचाकींचे रजिस्ट्रेशन शुल्क भरल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

विनानंबरचे कुठलेही वाहन रस्त्यावर धावू नये किंवा तसे आढळल्यास तत्काळ कारवाई करत वाहन जमा करून घेण्याचे सक्त आदेश वाहतूक पोलिसांना असताना गेल्या दीड वर्षांपासून वाहतूक शाखेच्या कर्मचारी व अधिकार्‍यांच्या नजरेत ही बाब कशी आली नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सातत्याने पाठपुरावा करावा

कुठल्याही शोरूमकडून वाहन खरेदी केल्यावर आपल्या वाहनाची नोंदणी झाली किंवा नाही याची चौकशी वाहनधारकांनी त्वरित करावी. तसेच शोरूममध्येही याचा सातत्याने पाठपुरावा करावा. विनानोंदणी वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा आहे. – विनय आहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

- Advertisement -

रजिस्ट्रेशन नंबरशिवाय गाडी ताब्यात घेऊ नये

नागरिकांनी कोणतीही गाडी घेताना कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होऊन रजिस्ट्रेशन नंबर आल्याशिवाय गाडी ताब्यात घेऊ नये. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याची पडताळणी आनलाईन करून घ्यावी. यासाठी सुविधा उपलब्ध आहे. – संजय गायकर, अवजड वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य, उपसचिव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -