घरमहाराष्ट्रनाशिकशिक्षक हवेत तर मुख्यमंत्र्यांना भेटा

शिक्षक हवेत तर मुख्यमंत्र्यांना भेटा

Subscribe

डोंगरगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षाला देवळा तालुका गटविकास अधिकारी सुनीता धनगर यांचा धमकीवजा इशारा

तुमच्या शाळेला शिक्षक पाहिजे असतील तर तुम्ही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना भेटा, खबरदार मला फोन केला तर, असा धमकीवजा इशारा देवळा तालुका गटविकास अधिकारी सुनीता धनगर यांनी डोंगरगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला दिला. यावरून लोकप्रतिनिधींचा अधिकार्‍यांवर वचक नसल्याचे दिसून येते.

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. बदली प्रक्रियेमध्ये येथून चार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तसेच मुख्याध्यापक पद रिक्त आहे. चार बदली शिक्षकांच्या बदल्यात एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. यामुळे मुख्याध्यापकांसह चार पदे रिक्त असल्याने डोंगरगाव ग्रामपंचायतीने व शालेय शिक्षण समितीने गटविकास अधिकार्‍यांना लेखी अर्जाद्वारे शिक्षक देण्याची विनंती केली. शाळा सुरू होऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सावंत यांनी ग्रामपंचायत सदस्यांसमोर गट शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना फोन केला असता त्यांनी उलट सावंत यांना धारेवर धरले. शासनाने सहाशे शिक्षक कमी केले. शिक्षक काय माझ्या घरी पैदा होत नाही. तुम्हाला शिक्षक हवे असतील मुख्यमंत्र्याला किंवा शिक्षणमंत्र्याला भेटा. एका पगारात दोन ठिकाणी काम करते. तसेच इथल्या शिक्षकांनाही दोन- दोन वर्ग शिकवायला सांगा आणि येथून पुढे फोन करायचा नाही. माझी जर कुणाकडे तक्रार केली तर गाठ माझ्याशी आहे याद राखा, असा धमकीवजा इशारा धनगर यांनी दिल्याने सावंत यांना प्रचंड मनस्ताप झाला आहे.

- Advertisement -

बदनामीचे कारस्थान : धनगर

सदर संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्याशी संपर्क साधला असता बदनामी करण्याचे कारस्थान आहे. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर महेश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -