घरमहाराष्ट्रनाशिकबेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी ठेकेदारासह दोषींवर कारवाई

बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी ठेकेदारासह दोषींवर कारवाई

Subscribe

आ. अहिरेंमुळे वृक्षांना विधीमंडळात मिळाला न्याय

नाशिक : नाशिक शहरात प्रशासन व काही लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीला अखेर विधीमंडळात न्याय मिळाला. आमदार सरोज आहिरे यांनी वडनेरगेटला ठेकेदार उत्तम सोनवणे याने 7 व 8 जानेवारी रोजी बेकायदेशीरपणे तोडलेल्या 51 झाडांचा मुद्दा आमदार आहिरे यांनी सोमवारी (दि. 14) लक्षवेधीव्दारे विधीमंडळात उपस्थित केला. नगरविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना ठेकेदारासह सर्वच दोषींवर कारवाई केली जाणार असून, कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याची ग्वाही दिली.

 उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार रस्ता रुंदीकरण व विकासकामे करताना अडथळे ठरणारी झाडे व फांद्या विशेष परवानगीनंतरच छाटता येतात. मात्र, वडनेरगेट येथे 50 झाडे विनापरवानगी तोडण्यात आली. वाहतूक किंवा पथदीपांना अडथळा न ठरणारी वड, आंबा, चिंच अशी 50 हून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली. कोरोना काळात ऑक्सिजनची गरज सर्वांनी अनुभवली. महापालिकेने कंत्राटदार नेमलेला नसतानाही उत्तम सोनवणे याने महापालिकेच्या गाड्या लाऊन ही झाडे तोडली. मी प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. त्यातच चुका आहेत. 50 झाडे तोडलेली असताना 36 झाडे तोडल्याचे अहवालात नमूद आहे.

- Advertisement -

झाडांचे मूल्य 50 लाख असताना २० लाखांचाच दंड ठेकेदार उत्तम तुकाराम सोनवणेला करण्यात आला आहे. महापालिकेने त्याची नेमणूक केलेली नसतानाही त्याने 50 झाडे बेकायदेशीर तोडली. वृक्षप्रेमींनी येऊन उर्वरीत झाडे वाचवली. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली. मग महापालिकेने गुन्हा का नोंदवला नाही?, असा सवालही आमदार आहेर यांनी उपस्थित केला होता.यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, वडनेरगेटच्या प्रभाग 22 मध्ये 36 वृक्ष व त्यांच्या फांद्या अनधिकृतपणे तोडण्यात आल्या. उपनगर पोलिसांनी याबाबत 9 जानेवारीला पाहणी केली. ठेकेदार उत्तम सोनवणे याने मजुरांतर्फे वृक्षतोड व छाटणी केल्याचे रहिवाशांनी सांगितले.

 ही लाकडे आपल्या गाडीतून (एमएच-04, सीपी- 9196) त्याने अमरधाममध्ये पाठवली. 10 जानेवारीला पंचनामा झाला. वृक्षासंदर्भातील सुधारीत कायदा, नियमावलीनुसार वृक्षांचे वय व मूल्यांकनानुसार तोडलेल्या या झाडांचे 20 लाख 35 हजार मूल्य निश्चित करून या रकमेची दंडाची नोटीस उत्तम सोनवणेला पाठवली आहे. दंड वसूलीची कारवाई सुरू आहे. 20 जानेवारीला उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दंड भरला नाही तर या ठेकेदाराच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई करण्यात येईल. अधिकारी व संबंधित दोषींवर कारवाईची मागणी आमदार आहिरे यांनी केली आहे. पोलिस तपासातील निष्कर्षांनुसार दोषी अधिकारी व व्यक्तींवर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

वृक्षतोडीचा हा प्रकार नाशिकसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा व तितकाच गंभीर होता. याकडे केवळ एक घटना म्हणून दुर्लक्ष झाले असते तर अशा घटना वारंवार घडल्या असत्या. आमदार सरोज आहिरे यांनी विधीमंडळात लक्षवेधीव्दारे जो आवाज उठवला. त्यामुळे बळी गेलेल्या वृक्षांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला.
– वैभव देशमुख, पर्यावरण प्रेमी, कर्तव्यशील सामाजिक संस्था

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -