घरमहाराष्ट्रनाशिकआघाडीच्या उमेदवाराला मनसेचे 'सूचक'

आघाडीच्या उमेदवाराला मनसेचे ‘सूचक’

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्यक्ष एकाही पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला नसला तरीही, स्थानिक पातळीवर मात्र मनसेचे पदाधिकारी थेट काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोदी-शहांविरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर मनसेचे पदाधिकारी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी, ९ एप्रिलला अर्ज भरण्यासाठी आलेल्या आघाडीच्या उमेदवारासाठी सूचक-अनुमोदक म्हणून मनसे पदाधिकारी आलेले होते.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असलेल्या समीर भुजबळ यांचा अर्ज भरण्यासाठी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेतेदेखील आलेले होते. त्यात मनसेचे नेते अॅड. राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडकदेखील उपस्थित होते. यापूर्वीही छगन भुजबळ जिल्हाधिकाऱी कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यासमवेत मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि अन्य पदाधिकारीदेखील होते. राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्याविरोधात आपला लढा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच आपसूकच त्याचा थेट अर्थ आघाडीला पाठिंबा असाच होत असल्याने मुंबईसह नाशिकमध्येदेखील पदाधिकारी थेट आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याचे चित्र आहे. मंगळवारीदेखील नाशिककरांना याची प्रचिती आली.

- Advertisement -

भुजबळांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. नाशिकमध्ये राज यांचा करिष्मा काम करेल आणि त्याचा थेट लाभ आघाडीच्या उमेदवाराला मतांच्या रुपाने होईल, अशी अपेक्षा आघाडीच्या नेत्यांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -