घरमहाराष्ट्रनाशिकबसस्थानकांवर एसटीचे बाटलीबंद पाणी

बसस्थानकांवर एसटीचे बाटलीबंद पाणी

Subscribe

रेल्वेच्या धरतीवर महामंडळाचा उपक्रम

रेल्वेने प्रवाशांसाठी ज्या प्रमाणे कमी दरात बाटलीबंद पाणी रेल्वेस्थानकांवर उपलब्ध करून दिले जाते, त्या धर्तीवर बसस्थानकांवरदेखील राज्य परिवहन महामंडळाने बाटलीबंद पाणी कमी दरात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे एसटी बसस्थानकांवरील खासगी विक्रेत्यांकडून पाण्यासाठी होणारी प्रवाशांची लूट थांबणार आहे.

एसटी महामंडळाने पुरवठादारांना राज्य परिवहनचे मानचिन्ह, मुद्रांकित बाटल्यांद्वारे बसस्थानकांवर वाणिज्य आस्थापनांद्वारे पाणी विक्री करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना महागड्या पाण्याच्या बॉटल्स घेण्याची गरज भासणार नाही. एसटीच्या प्रत्येक बसस्थानकांवर बाटलीबंद पाणी 250 मिलीमीटर ते एक लीटरपर्यंतच्या बॉटल्समध्ये उपलब्ध असेल. रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी प्रत्येक रेल्वेस्थानकांवर रेल नीर नावाच्या ब्रॅंडने पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या बॉटल्स कमी दरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच त्याची विक्री स्थानकांवर एजंटकडून झालीच पाहिजे, अशी सक्तीही केलेली आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या खान-पान बोगीतही कॅटरिंग व्यावसायिकांना रेल नीर विक्री करण्याची सक्ती केलेली आहे. त्याचबरोबर स्थानकांवर नाममात्र दरात शुद्ध पाण्याची व्यवस्था करताना वॉटर एटीएम बसविलेले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांची उत्तम सोय झाली आहे. एसटीही दर दिवसाला लाखो प्रवाशांची वाहतूक करते. या प्रवाशांनाही आता ही सुविधा उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याच्या प्रश्नही उद्भवणार नाही. लवकरच प्रत्येक स्थानकावर एसटीचे बाटलीबंद पाणी उपलब्ध होईल.

स्थानकांवरील लूट थांबणार

एसटीच्या विविध बसस्थानकांवर एक लीटर बाटलीबंद पाणी 20 ते 25 रुपयांना विक्री होते. तर काही ठिकाणी हीच बॉटल 15 रुपयांना खाद्यपदार्थ विक्रेते विकतात. तसेच काही बॉटल नॉनब्रॅण्डेड असतानाही त्यांची विक्री 15 ते 20 रुपयांना केली जात होती. त्यामुळे प्रवाशांना तहान भागवण्यासाठी महागड्या दराने बाटलीबंद खरेदी करावी लागत होती. एसटीच्या पाण्याची बाटली 250 मिलीलिटर, 500 मिलीलिटर आणि 1 लिटर या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मात्र, एसटीने पाण्याचे दर अद्याप निश्चित केलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -