डाळिंब विक्रेत्याचा खून; पंचवटीत दोन दिवसांत दुसरा खून

डोक्यात दगड घालून केला खून, गुंडगिरीसह टोळीयुद्धाचा भडका

murder

पंचवटी – पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर बुधवारी (दि.२३) मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने डाळिंब विक्रेत्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दोनच दिवसांपूर्वी म्हसरुळ भागात याच पद्धतीने एका तरुणाची हत्या झाली होती. या प्रकारामुळे पंचवटीतील टोळीयुद्ध आणि गुंडगिरीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राजेश शिंदे (रा. भराडवाडी, फुलेनगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी राजेश शिंदे हे मोटरसायकलने घराकडे जात असताना पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर अज्ञात काही हल्लेखोरांनी शिंदे यांची गाडी अडवली. त्यानंतर मागील भांडणाच्या वादातून डोक्यात दगड टाकून खून केला. या घटनेत राजेश शिंदे जागीच ठार झाले. शिंदे हे बाजार समितीत डाळिंब व्यवसाय करत असल्याचं समजतं. ही हत्या कुणी आणि का केली, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलात पाठवला.

पोलिसांवर रोष, नागरिक रस्त्यावर

या खूनाच्या घटनेनंतर शिंदे ज्या भागात राहत होते, त्या भागातील स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. या घटनेतल्या संशयितांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमत घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर जमाव पांगला. मात्र, पोलिसांची हतबलता आणि वाढती गुन्हेगारी यामुळे शांत पंचवटीचं नाव बदनाम होऊ लागल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.