घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकमी भावात बेंच विकतो म्हणून 'त्या' व्यावसायिकाचा खून

कमी भावात बेंच विकतो म्हणून ‘त्या’ व्यावसायिकाचा खून

Subscribe

नाशिकरोड : व्यवसायाच्या स्पर्धेतून फर्निचर व्यावसायिक शिरीश सोनवणे यांचे अपहरण करत खून करण्यात आला असून खुनाच्या गुन्ह्यातील तिघे संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली, दरम्यान संशयितांनी खुनाचा गुन्हा कबूल केला आहे. जिल्हा न्यायालयाने ४ ऑक्टोबर पर्यंत संशयित तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे नाशिक शहर पोलिसांनी सांगितले.

एकलहरे रोडवरील स्वस्तिक फर्निचर या कारखान्याचे मालक शिरीश गुलाबराव सोनवणे यांचे ९ सप्टेबर रोजी संध्याकाळी तिघांनी एक हजार बेंच बनवण्याची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने स्वीफ्ट कारमधून अपहरण केले. दुसर्‍या दिवशी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला होता, ग्रामीण पोलिसांनी तपास करत नाशिकरोड पोलिसांना कळविल्यानंतर मृत सोनवणे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत करून बेशुद्ध अवस्थेत पाण्यात टाकल्याचा अहवाल आल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्र हातात घेतली असली तरी घटनेची सुरुवात नाशिकरोड येथून झालेली असल्याने गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यावर अपहरण करुन खून करण्याच्या घटनेने नाशिक शहर हादरले होते.

- Advertisement -

नाशिक शहर पोलिसांच्या सर्व गुन्हे शाखेसह नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरु केला होता. कारखान्यातील कामगार फिरोजसह सर्व कामगार व नातेवाईक यांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. वीस दिवसानंतर सोनवणे यांच्या खूनाचा उलगडा करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आल्याने पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पथकाचे कौतुक केले. तसेच माहिती देणार्‍या व्यक्तीला रिवार्ड दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

अशी मिळाली तपासाला दिशा

 मयत सोनवणे यांचे कोणतेही वाद, धमकी, खंडणी अशा कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने आर्थिक बाजू समजून घेण्यासाठी बँक डिटेल्स मागविण्यात आले. विशेष म्हणजे, सोनवणे यांचा खून झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मयत सोनवणे यांच्या बँक खात्यावरुन दोन हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यावर तांत्रिक मुद्द्यावर तपास सुरु केल्यावर संशयितांनी नाशिकरोड येथील मोबाईल दुकानातून नवीन मोबाईल घेत त्यातून सिडको परिसरात १०० रुपयांची फळे विकत घेतली व दोन हजार रुपये फळ विक्रेत्याच्या मोबाईलवर व्यवहार केला. त्यातून उर्वरीत रक्कम संशयितांनी परत घेतली. तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल दुकानातील सीसीटीव्ही फूटेज व फोटो पोलिसांनी व्हायरल केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सोमनाथ कोंडाळकर या संशयिताची माहिती मिळाली. त्याप्रमाणे गुरुवारी (दि.२९) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबड भागातून कोंडाळकर याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्या पथकाने चाळीसगाव येथील प्रवीण काळे पाटील याच्या घरी मध्यरात्री सापळा रचून ताब्यात घेतले, प्रवीण पाटील याच्या माहितीनुसार सिडकोच्या विजयनगर भागातून पहाटे तीनच्या सुमारास चालकाला ताब्यात घेतले. तिघा संशयितांनी गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -
कारचालकाच्या नावात गोपनीयता

नाशिक शहर पोलिसांनी दोघांची नावे जाहीर केली. मात्र, कारचालकाच्या नावाबाबत गोपनीयता ठेवली आहे. तिघे संशयित आरोपींना नाशिक शहर पोलिसांनी अटक केली. तरीही, त्यांना मीडियासमोर का आणले नाही, यावर तपासाचा भाग असल्याचे सांगत आयुक्तांनी नकार दिला. संशयित तिसरा राजकीय पदाधिकार्‍याच्या किंवा एखाद्या सरकारी वरिष्ठ अधिकारी कर्मचार्‍याच्या जवळचा असल्याची चर्चा आहे.

व्यवसायाच्या स्पर्धेतून खून

सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (वय ३६) व प्रवीण आनंदा काळे-पाटील (२८) या दोघांचा भागीदारीत अंबड परिसरात बेंच व इतर वस्तू बनविण्याचे फेब्रिकेशन व्यवसाय आहे. मात्र, गेल्या ३ महिन्यापासून एकही आर्डर न मिळाल्याने दोघेही आर्थिक विवंचनेत फसले होते. चार महिन्यांपासून वर्कशॉप व राहते घराचे भाडे थकले होते. त्यामुळे मयत सोनवणे यास धमकावून कामाची आर्डर घेण्यासाठी अपहरण केले होते. यावेळी सोनवणे यांनी विरोध केल्याने संशयितांनी खून केला, दरम्यान प्रवीण काळे-पाटील याने चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील बिलाखेड येथील त्याच्या मेव्हण्याकडे जावून मुंबई येथे गणपतीच्या दर्शनाला जायचे आहे असे सांगून त्याची स्वीफ्ट कार आणून कारची नंबरप्लेट बदलून गुन्ह्यात वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.

असा आहे अपहरण, खूनाचा घटनाक्रम

  • ९ सप्टेंबरला नाशिकरोड येथून सोनवणे यांचे अपहरण
  •  ११ सप्टेंबरला मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  •  ११ सप्टेंबरला संशयितांनी सोनवणेंचे सीम वापरुन आर्थिक व्यवहार
  •  १२ सप्टेंबरला नाशिकरोड पोलिसांकडे गुन्हा वर्ग
  •  १२ सप्टेंबरला पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखा, गुन्हे शाखा एक व दोन तपासात सक्रिय
  •  १३ सप्टेंबरला संशयित आरोपी मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही फुटेज कैद
  •  १७ सप्टेंबरला पोलिसांकडून संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
  •  २९ सप्टेंबरला नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना संशयिताची माहिती एक जण ताब्यात
  •  ३० सप्टेंबरला रात्री दीड वाजता चाळीसगाव येथून प्रवीण पाटील यास अटक.
  •  ३० सप्टेंबरला पहाटे ३.३० वाजता सिडको येथून कारचालकाला अटक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -