एअर अलायन्सची नाशिक-पुणे विमानसेवा

ऑक्टोबरपासून सेवा सुरू होणार; उडाण योजनेत समावेश, हवाईमार्गाद्वारे विविध शहरांची कनेक्टिविटी उपलब्ध

Viman Seva

नाशिक सेवेचा विस्तार आता वेगाने होत आहे. दोनच दिवसांपूर्वी इंडिगो कंपनीला नाशिक – दिल्ली सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली. आता नाशिक- पुणेसाठी एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सला नाशिक- पुणेसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्यात आला असून आता आठवडाभर ही सेवा दिली जाणार आहे. ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे.

केंद्राच्या उडाण योजनेंतर्गत सर्वात प्रथम नाशिक- मुंबई आणि नाशिक- पुणे सेवा सुरू करण्यात आली. एअर डेक्कनमार्फत सुरू करण्यात आलेली ही सेवा मात्र अल्पावधीतच बंद पडली. एअर डेक्कनच्या उडाणअंतर्गत सर्वच सेवांबाबत तक्रारी येऊ लागल्याने या योजनेतून कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात आले. मात्र, हा स्लॉट घेण्यासाठी कोणत्याही कंपनीने पुढाकार दर्शवला नाही. त्यामुळे या कंपनीला दिलेला स्लॉट इतर कंपन्यांना देण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली. उडाणच्या तिसर्‍या टप्प्यात या मार्गासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. यात एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सला नाशिक- पुणेसाठी स्लॉट देण्यात आला आहे. सध्या अलायन्स एअरमार्फत नाशिक अहमदाबाद व हैदाराबादसाठी सेवा दिली जाते. आता अलायन्समुळे नाशिक हे तीन शहरांशी जोडले जाणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. साधारणपणे २७ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणे प्रस्तावित आहे.

आठवडाभर मिळणार सेवा

पुण्यासाठी नाशिकहून आता आठवडाभर सेवा दिली जाणार आहे. सोमवार ते शनिवार ही सेवा सायंकाळी असेल तर रविवारी ही सेवा सकाळी असेल. ए ३२० प्रकारातील ७० आसनी विमानाद्वारे ही सेवा दिली जाणार असून पहिल्या ३५ आसनांसाठी उडाण अंतर्गत तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे.