घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-पुणे हायस्पीड मार्ग रेल्वे मंत्रालयाच्या पिंकबुकमध्ये; कामाला मिळणार गती

नाशिक-पुणे हायस्पीड मार्ग रेल्वे मंत्रालयाच्या पिंकबुकमध्ये; कामाला मिळणार गती

Subscribe

८० किलोमीटरचे सर्व्हेक्षण पूर्ण, उर्वरित सर्वेक्षण पूर्ण होऊन या महिन्यात रेल्वे बोर्डासमोर आराखडा मांडला जाणार

श्रीधर गायधनी

नाशिक-पुणे या २३१ किलोमीटर लांबीच्या हायस्पीड रेल्वे मार्गाचा रेल्वे मंत्रालयाच्या पिंकबुकमध्ये समावेश करण्यात आला आहे. तत्काळ पूर्ण करण्याच्या कामांचाच पिंकबुकमध्ये समावेश केला जात असल्याने, या मार्गाचे काम तत्काळ सुरू होण्याचे संकेत आहेत. या रेल्वेमार्गाचा अहवाल तयार करण्यात आला असून, त्यापैकी १८० किलोमीटरचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण काही दिवसांत पूर्ण होऊन या महिन्यात रेल्वे बोर्डासमोर आराखडा मांडण्यात येणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम केले होते. मात्र, सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच हा प्रकल्प नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल) वर्ग करण्यात आला. महारेलने नाशिक-पुणे रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू केली असून त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून सर्व्हेक्षण सुरू केले आहे. हा मार्ग दुहेरी ट्रॅक असून यासाठी ७५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी १५०० कोटी रुपये निधी केंद्र व राज्य मिळून उभारणार आहे. उर्वरित ४५०० कोटी वित्तीय संस्था आणि इतर गुंतवणूकदारांकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करणार आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे. या ट्रॅकवर २२० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे.

असा आहे मार्ग

प्रस्तावित रेल्वेमार्ग नाशिकरोड, एकलहरे, जाखोरी, सिन्नर, दोडी, देवठाण, संगमनेर, अंबोरे, साकूर, जांबूत, बोटा, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण, आळंदी, वाघोली, कोलवाडी, हडपसर, पुणे असा असणार आहे.

- Advertisement -

मार्गात होणारी कामे

नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील १३०० हेक्टर जमीन संपादन
*नदी व मोठ्या नाल्यांवर १५ पूल
* मार्गावर १२ मोठे बोगदे असणार असून एकूण लांबी २१ किलोमीटर आहे.
* मार्गाची एकूण लांबी २३१.७६१ किलोमीटर
* ७ रेल्वे उड्डाणपूल
* १५० लहान पूल
* ९९ छोटे भुयारी मार्ग

प्राधान्याची कामेच पिंकबुकमध्ये

अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्यानंतर जे नवीन रेल्वे प्रकल्प तात्काळ कार्यान्वित करायचे असतील अशाच प्रकल्पांचा समावेश रेल्वेमंत्रालयाच्या पिंकबुकमध्ये केला जातो. त्यापैकीच नाशिक पुणे रेल्वे मार्ग आहे. – ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -