घरताज्या घडामोडीठेकेदाराची बनवाबनवी! वेतन १० हजार प्रतिज्ञापत्र मात्र २२ हजारांचे

ठेकेदाराची बनवाबनवी! वेतन १० हजार प्रतिज्ञापत्र मात्र २२ हजारांचे

Subscribe

वॉटरग्रेस ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे ब्लॅकमेलिंग, नगरसेवक दिनकर पाटील यांचा आरोप

नाशिक – शहर स्वच्छतेसाठी सातशे कर्मचारी नियुक्तीचा ठेका घेणार्‍या वॉटर ग्रेस कंपनीच्या तक्रारींचा पाढा महासभेत वाचला गेल्यानंतर आता संबंधित ठेकेदाराने कर्मचार्‍यांना ब्लॅकमेलिंग सुरु केल्याची तक्रार माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आयुक्तांसह वैद्यकीय विभागाकडे केली आहे. संबंधित ठेकेदार कर्मचार्‍यांना केवळ १० हजारच वेतन देत असून त्यांच्याकडून २२ हजार रुपये वेतन मिळत असल्याचे प्रतिज्ञापत्र बळजबरीने घेत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

वॉटर ग्रेस ठेकेदाराचे ‘कारनामे’ सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या महासभेत चव्हाट्यावर आणले होते. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी निदर्शनास आणून दिले होते की, आऊटसोर्सिंगने नियुक्त केलेल्या स्वच्छता कर्मचार्‍यांंना नियमानुसार वेतन मिळत नाही. कर्मचार्‍यांना किमान २२ हजार वेतन देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात संबंधितांना केवळ दहा हजारच वेतन दिले जाते. कर्मचारी नियुक्त करताना पंधरा हजार रुपये आगाऊ घेतल्याची कबुली ठेकेदाराने दिली आहे. असे असतानाही त्यावर आजवर कारवाई झालेली नाही. प्रशासनातील काही अधिकारी संगनमताने ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. गरीबांच्या मुलांची लुट करणार्‍या वॉटर ग्रेस ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली होती. सभागृहातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी या मागणीच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती. प्रशांत दिवे यांनी तर ठेकेदारावर गंभीर आरोप करीत काही कर्मचार्‍यांकडून महिला कर्मचार्‍यांवर अत्याचार होत असल्याची बाबही पुढे आणली होती.

- Advertisement -

वॉटर ग्रेसचे हे घाणेरडे ‘उद्योग’ तातडीने न थांबल्यास अधिकार्‍यांना रस्त्यावरुन फिरणेही मुश्किल होईल असा गर्भीत इशाराही यावेळी देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी समितीची नेमणूक करावी असा आदेश यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी या चर्चेअंती दिला. मात्र चौकशीच दोषांचा ठपका येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने आता कर्मचार्‍यांना वेठीस धरत त्यांच्याकडून २२ हजार रुपये वेतन मिळत असल्याचे प्रतिज्ञापत्र बळजबरी घेण्याचा उद्योग सुरु केला आहे, अशी तक्रार दिनकर पाटील यांनी आयुक्तांसह वैद्यकीय विभागाचे डॉ. आवेश पलोड यांच्याकडे केली. ठेकेदाराच्या मानसिक त्रासातून कर्मचार्‍यांच्या जीवीताला धोका निर्माण होईल, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दिनकर पाटील यांचा आरोप

महासभेनंतर आपले पितळ झाकण्यासाठी ठेकेदार आता कर्मचार्‍यांना वेठीस धरत असून त्यांच्याकडून खोटे प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाचे डॉ. आवेश पलोड यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी या तक्रारीची दखलच घेतली नाही. ठेकेदारावर कारवाई केली जात नाही, म्हणजेच डॉ. पलोड यांचे ठेकेदाराशी साटेलोटे असल्याचा संशय येतो. – दिनकर पाटील, नगरसेवक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -