घरमहाराष्ट्रनाशिकएनडीएसटी: संस्थाचालक नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ

एनडीएसटी: संस्थाचालक नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या एनडीएसटी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ-प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले. सत्ताधार्‍यांवर आरोपांची राळ उडवत ही निवडणूकच रद्द करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी गटाने निवडणुकीसह सभासदांचा विश्वासही जिंकला.

विरोधकांचे दोन गट पडले. त्यात संस्था चालकांचा परिवर्तन पॅनल आणि टीडीएफ-डीसीपीएस या पॅनलला तर पूर्ण उमेदवारही मिळाले नाही. मग निवडणुकीचा अट्टाहास त्यांनी का केला, हाच मूळ प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला. विरोधकांचे दोन गट झाल्याने त्यांना मिळणार्‍या मतांचे विभाजन झाले. यात परिवर्तन पॅनलचे संग्राम करंजकर हे एकमेव विजयी उमेदवार. त्यांनी चंद्रशेखर सावंत यांना थोड्या मतांनी पराभूत केले. असाच प्रकार महिला गटातही घडला. सिन्नरच्या सविता देशमुख यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव झाला. या दोन तुल्यबळ लढती सोडल्या तर उर्वरित उमेदवारांमधील फरक हा फार मोठ्या प्रमाणात राहिला. यावरुन मतदारांची मानसिकता प्रगतीला साथ देणारीच असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सर्वांना सोबत घेवून प्रचाराचा गाडा ओढण्यात या पॅनलचे प्रमुख मोहन चकोर यांच्या नेतृत्वात बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाठ, अरुण पवार यांनी सूत्रबध्द नियोजन केले. 2010 च्या निवडणुकीत प्रकाश सोनवणे यांनी एकहाती सत्ता मिळत सोसायटीत इतिहास घडवला. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी पुर्ण पॅनल विजयी करत इतिहासाची पुनरावृत्ती चकोर यांच्या नेतृत्वाने करुन दाखवली.

- Advertisement -

माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल व आर. डी. निकम यांच्या टीडीएफ-डीसीपीएस पॅनलला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अधिकृत टीडीएफ कुणाची हा सर्व सभासदांना पडलेला प्रश्न या निवडणुकीत निकाली निघाला. प्रत्येक पॅनलने टीडीएफ या संघटनेचे नाव वापरले. पण त्याचा फारसा प्रभाव मतदारांवर पडला नाही. याचा अर्थ सरळ आहे की, कथित शिक्षक नेते किंवा संस्थाचालक यांना आत्मपरीक्षणाची हीच योग्य वेळ म्हटली पाहिजे. शिक्षकांच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी किंवा संस्थाचालकांनी सहभागी होऊच नये, अशा प्रकराचा धडा या निवडणुकीने त्यांना शिकवला आहे. यातून त्यांनी वेळीच बोध घेतला तर बरे; अन्यथा, संस्थेतील मतदार सूज्ञ आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -