घरमहाराष्ट्रनाशिक‘नीट’परीक्षेतील कडक ड्रेसकोडचा विद्यार्थिनींना मनस्ताप

‘नीट’परीक्षेतील कडक ड्रेसकोडचा विद्यार्थिनींना मनस्ताप

Subscribe

 विद्यार्थिनींच्या बाह्यांसह कापल्या नाक-नाकातील रिंग्ज ,अनेकांना परीक्षेविनाच फिरावे लागले माघारी

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी, ५ मे रोजी राज्यभरात नीट (नॅशनल एलिजीबिलीटी कम एण्ट्रन्स टेस्ट) परीक्षा पार पडली. परीक्षेला येण्यापूर्वी कानात, नाकात रिंग्ज घालून येऊ नयेत, तसेच फुल बाह्यांचे कपडे घालू नये असे स्पष्ट निर्देश एनटीएकडून दिले असतानाही अनेक परिक्षा केंद्रांवर पूर्ण बाह्या आणि कान, नाकात रिंग्ज घालून आल्याने त्या विद्यार्थिनींच्या बाह्या तसेच रिंग्ज कापण्यात आल्या. रिंग्जच्या माध्यमातून मायक्रो फोन लावून विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी येऊ शकतात, अशी या कारवाई मागील कारण होते. त्यामुळे या परीक्षेचे कठोर नियम विशेषत: विद्यार्थिनींसाठी तापदायी ठरले. मुंबईसह राज्यामध्ये तब्बल दोन लाख विद्यार्थी परीक्षेला बले होते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्या मार्फत राज्यातील मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक व ठाणे अशा १७ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. प्रवेशासाठीची चुरस लक्षात घेता, विद्यार्थ्यांकडून अनेक दिवसांपासून अभ्यास सुरू होता. दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येत होता. या परीक्षेसाठी केंद्रात येताना कोणते निकष पाळावेत, याची संपूर्ण माहिती परीक्षार्थींना आधीच दिलेली होती. मात्र, तरीही अनेक विद्यार्थी पुरेशा तयारीविनाच परीक्षेसाठी आल्याचे दिसून आले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यात अधिक संख्या होती. अनेक मुलांसह मुलींनीही लांब बाह्या असलेले कपडे घातले होते. तसेच, काही मुलींच्या कानात व नाकात रिंग्ज होत्या. केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी आणि व्हिडिओ शुटिंग होत असल्याने अत्यंत काटेकोरपणे तपासणीनंतरच प्रवेश दिला जात होता.

- Advertisement -

नाशिकमध्ये 14 हजार 700 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिकमध्ये 27 परीक्षा केंद्रांवर 14 हजार 700 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण होते. तर चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंगनुसार एका गुणाची कपात होणार आहे. फिजिक्स व केमिस्ट्री विषयाचे प्रत्येकी 45 प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजी (बॉटनी व झुलॉजी) विषयाच्या 90 प्रश्नांसाठी 360 गुण होते. एकूण 720 गुणांसाठी ही परीक्षा घेतली गेली. 6 जूनला परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

डॉक्टर दाम्पत्याची ३२ परीक्षार्थींना मदत

नेहरुनगर येथील केंद्रावर बहुतांश परीक्षार्थी हे ग्रामीण भागातून आलेले होते. त्यातील अनेकांनी नियमच वाचलेले नसल्याने काहींना ड्रेसकोडमुळे तर काहींना धातुच्या वस्तूंमुळे प्रवेश मिळणार नव्हता. या वेळी मुलीला सोडवण्यासाठी आलेल्या डॉ. नागेश व मंजिरी मदनूरकर यांनी तातडीने आपल्या गाडीतील वैद्यकीय साधनांद्वारे ३० परीक्षार्थींच्या ड्रेसच्या लांब बाह्या कापल्या. तसेच, त्यातील काही मुलींच्या कान व नाकातील रिंग कापून दिल्या. परीक्षा केंद्र चुकलेल्या दोन विद्यार्थ्यांनाही त्यांनी वडनेर गेट येथील केंद्रात सोडले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना पेपर गेला सोपा

रविवारी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. परीक्षा देऊन केंद्राबाहेर येताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न सोप असल्याने पेपर निर्धारित वेळेत झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

बायोलॉजीचे चार प्रश्न अवघड

पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या बायोलॉजीच्या चार प्रश्नांनी विद्यार्थी परेशान झाले. बायोलॉजीचे काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यात त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले.

परीक्षेतील 80 टक्के प्रश्न ही सोपे होते. परंतु 20 टक्के प्रश्न हे वेगळ्या प्रकारे विचारण्यात आले होते. एनसीआरटीचा प्रत्येक टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर फारच सोपा होता. कारण बहुतांश प्रश्न हे अभ्यासक्रमातीलच विचारण्यात आले होते. पेपर सोपा असल्याने निकालही चांगला लागेल.
– सैयद मोहम्मद जिलानी, विद्यार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -