नाशिक शहरात संवेदनशील ठिकाणी नो ड्राय फ्लाय झोन

Ban on Import of Drones govt bans import of drones provides certain exceptions
Ban on Drones

पाकिस्तानातून अमली पदार्थांची तस्करी करणारा ड्रोन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आल्याने देशभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरातील १६ अतिसंवेदनशील ठिकाणी नो ड्रोन फ्लइंग झोन घोषित केला आहे. नो ड्रोन फ्लाय झोनचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.
नाशिक शहरात पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडविता येत नाही. मात्र, कोरोनाकाळात महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात विनापरवानगी ड्रोन उडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणेने सतर्क होत तपास केला होता. तेव्हापासून शहरात ड्रोन वापराच्या निर्बंधांत वाढ करण्यात आली आहे. आता दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नो ड्रोन फ्लाय झोनची घोषणा करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणांची यादी घोषित केली आहे. यामध्ये पोलीस, सैन्य दल, एअर फोर्ससह प्रेस आणि मंदिरांचा समावेश आहे. या परिसरासह त्याच्या दोन किलोमीटर हवाई क्षेत्रात ड्रोनसह फ्लाइंग साधने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. या संवेदनशील ठिकाणांच्या दोन किलोमीटर परिसरात कोणतेही ड्रोन (मानवरहीत साधन), पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून्स, मायकोलाईट एअरकाष्ट या हवाई साधनांना झेपावण्यासाठी पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

मनाई असलेली साधने
संवेदनशील व प्रतिबंधीत क्षेत्रांच्या ठिकाणी ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाईट एअरक्राप्ट या साधनांना मनाई करण्यात आली आहे.

अशी आहेत नो ड्रोन फ्लाय झोन
स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प, इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, शासकीय मुद्रणालय गांधीनगर, काळाराम मंदिर, पंचवटी, एअरफोर्स स्टेशन, बोरगड, म्हसरूळ व देवळाली (साऊथ), देवळाली कॅम्प, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, गांधीनगर, मध्यवर्ती कारागृह, जेलरोड, किशोर सुधारालय, सीबीएस, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी व गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, महाराष्ट्र पोलीस अकादमी परिसर, आकाशवाणी केंद्र, पोलीस मुख्यालय व पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन नाशिक रोड व देवळाली कॅम्प, महापालिकेची सर्व जलशुध्दीकरण केंद्रे या ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे.

ड्रोन वापरासाठी परवानगी आवश्यक
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ड्रोनचालक व मालकांनी त्यांना ड्रोनद्वारे कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण करायचे असल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणाची माहिती अर्जात सादर करावी लागणार आहे. या अर्जामध्ये तारीख, वेळ, ड्रोनची सविस्तर माहिती, ऑपरेटरचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक आणि ड्रोन प्रशिक्षण घेतल्याचे छायांकित प्रमाणपत्र पोलिसांना द्यावे लागणार आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यावर ड्रोन वापरास परवानगी दिली जाणार आहे.

नो ड्रोन झोन फलक लावणे आवश्यक
हवाई साधनामार्फत संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणांच्या प्रमुखांनी मर्मस्थळ/ आस्थापनांच्या संरक्षण भिंतीवर नो ड्रोन झोन असे फलक लावावा लागणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.