स्मार्ट सिटीच्या खर्चाचा विशेष महासभेत पंचनामा

नाशिक बहिष्कार टाकूनही कोट्यवधीच्या कामांना मंजुरी देणारे सत्ताधारी व प्रशासनावर महासभेत विरोधक तुटून पडले

नाशिक बहिष्कार टाकूनही कोट्यवधीच्या कामांना मंजुरी देणारे सत्ताधारी व प्रशासनावर महासभेत विरोधक तुटून पडले. यात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा समावेश होता. अनेक स्मार्ट प्रकल्पांच्या वाढीव प्राकलनाचा महापालिकेवर आर्थिक भार पडणार आहे. यामुळे स्मार्ट सिटी कंपनीत नेमके काय चालले आहे हे सदस्यांना कळण्यासाठी विशेष महासभा बोलवावी आणि त्यासाठी कंपनीच्या अध्यक्षांसह अधिकार्‍यांना बोलवावे, अशी सूचना सदस्यांनी केली. त्यावर महापौर रंजना भानसी यांनी सदस्यांची सूचना मान्य करत खास महासभा घेण्याचे आश्वासन दिले.

गेल्या गुरुवारी महापालिकेत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीपूर्वी संचालक अजय बोरस्ते, शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांनी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांची भेट घेऊन स्काडा वॉटर मीटर निविदेतील शुद्धीपत्रक तसेच विविध प्रकल्पांसाठी अतिरिक्त खर्च होत असून, त्यासाठी महासभेची मंजुरी घेणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच कंपनीचे अधिकारी मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर कुंटे यांनी बैठकीत येऊन तुमचे प्रश्न मांडा असे सांगून संचालकांची मागणी धुडकावून लावली. यामुळे तिन्ही संचालकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. हाच मुद्दा पकडून बोरस्ते यांनी स्मार्ट सिटी कंपनी चार डोके चालवत असून, स्मार्टरोड, पार्किंगसह अनेक महत्वाचे विषयांमुळे नाशिककर हैराण झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

स्मार्ट प्रकल्प कोणते आणि सध्या काय सुरू आहे. त्यावर मनपाचा किती खर्च होणार आहे याविषयी नगरसेवकांनाही कळावे यासाठी विशेष महासभा घेण्याची सूचना त्यांनी केली. सभागृह नेते सतीश सोनवणे यांनीही महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार असेल, तर त्याविषयीची माहिती सभागृहाला कळणे गरजेचे असल्याचे सांगत स्मार्ट सिटी कंपनीत मनमानी कारभार सुरू असल्याच्या मुद्द्याला दुजोरा दिला. यामुळे मनमानी कारभार थांबवून जनता व नगरसेवकांना माहिती व्हावी यासाठी विशेष महासभा बोलवण्याची सूचना महापौरांना केली. स्मार्टच्या प्रत्येक कामाला अतिरिक्त पैसा द्यावा लागणार आहे. हे सर्व स्मार्ट सिटीतील अधिकारी करत असले तरी त्याचा संशय तुमच्यावर येऊ नये यासाठी महासभा बोलवाच, असे गजानन शेलार यांनी सांगितले. त्यावर महापौर भानसी यांनी स्मार्ट सिटीसंदर्भात दाखल करण्यात आलेली लक्षवेधी दाखल करून घेत लवकरात लवकर विशेष महासभा घेतली जाईल, असे आश्वासन दिले.