ओमायक्रॉनमुळे नाशिक शहरात मनाई आदेश

रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी; लग्नसोहळ्यात १०० व्यक्तींना उपस्थितीची परवानगी

नाशिक : कोरोनाच्या दोन्ही लाटेत संसर्ग रोखण्यात नाशिक शहर पोलिसांची महत्वपूर्ण भूमिका होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ओमायक्रॉनचा धोका आल्याने शहर पोलीस सतर्क झाले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी मंगळवारी (दि.२८)पासून २७ जानेवारी २०२२ पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. शिवाय, नागरिकांसासह व्यावसायिकांना नियमावली जाहीर केली आहे.

देशभर कोरोनाचा नवा व्हेरीयंट असलेल्या ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. शिवाय, कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने जिल्हा, आरोग्य यंत्रणांसह पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी खबरदारी म्हणून नागरिकांसाठी नियमावली तयार केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.

अशी आहे नियमावली

नव्या नियमांनुसार बंदिस्त ठिकाणी होणार्‍या सामाजिक, राजकीय, धार्मिक, लग्नकार्यास जास्तीत जास्त १०० व्यक्तींची तर खुल्या जागेत मैदानाच्या क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५० व्यक्ती यापैकी जे कमी असेल तितक्या नागरिकांना उपस्थितीची परवानगी दिली जाणार आहे. सिनेमागृह, हॉटेल, नाट्यगृहांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात जमावबंदी असून, पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांचा समूह किंवा एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण गर्दी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर, सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.