घरमहाराष्ट्रनाशिकराजकीय ‘स्पेस’ भरण्याची आपला संधी; मात्र गटबाजीचे ग्रहण

राजकीय ‘स्पेस’ भरण्याची आपला संधी; मात्र गटबाजीचे ग्रहण

Subscribe

महापालिका निवडणुकीवर खास लक्ष

नाशिक: राज्यात अचानक झालेला सत्ताबदल, शिवसेनेत पडलेली फूट, शिवसेनेला फोडण्यासाठी भाजपची रणनिती, बिकटप्रसंगी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पुरेशी न मिळालेली साथ, सत्तांतरात काँग्रेस, राष्ट्रवादीचा कुणीही न केलेला विचार, मनसेत आलेली शिथिलता आणि अन्य काही घडामोडींमुळे सर्वसामान्य मतदार कमालीचा अस्वस्थ आहे. आपल्या मताला काही किंमत आहे का, असा प्रश्न आता त्याला सतावत आहे. सर्वच प्रस्थापित पक्षाविषयी त्याचे नकारात्मक मत बनत असताना आम आदमी पक्षाचा सक्षम पर्याय त्याला काही प्रमाणात सुखावत आहे. त्यामुळेच ‘आम आदमी’ला अच्छे दिन येतील असे बोलले जाते. नाशिकमध्ये जितेंद्र भावे यांनी या पक्षात खर्‍या अर्थाने जीव आणल्याने आम आदमीची चर्चा घरोघरी सुरू झाली आहे. अंतर्गत गटबाजी रोखण्यात राज्य पदाधिकार्‍यांना यश आल्यास जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी करु शकेल, असे बोलले जात आहे.

राज्यातील घडामोडींमुळे राजकारणापासून दुरावत चाललेला सर्वसामान्य मतदार दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या कामाच्या पद्धतीवर चांगलाच मोहित झाला आहे. केजरीवाल यांनी सरकारी शाळांना आणि सरकारी रुग्णालयांना जो दर्जा प्राप्त करुन दिला आहे तसा दर्जा महाराष्ट्रातील सरकारी शाळा आणि रुग्णालयांंनाही मिळावा, अशी भोळी आशा मतदार बाळगून आहेत. परंतु, सद्यस्थितीत तरी शाळा, रुग्णालय आणि तत्सम बाबींवर गांभीर्याने विचार करताना महाराष्ट्रातील कुठलाही प्रस्थापित पक्ष दिसत नाही. गटबाजी, फोडाफोडी, आरोप- प्रत्यारोप आणि पैशांची उधळपट्टी इतक्याच हालचाली महाराष्ट्रातील राजकारणात काही दिवसांपासून बघायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मतदार हतबल झाला आहे.

- Advertisement -

गेल्या निवडणुकीत काहींनी युतीकडे बघून मतदान केले होते तर कुणी धर्मांध शक्तीला रोखण्याच्या दृष्टीने आपला मतदानाचा हक्क बजावला होता. काहींना मुलभूत सुविधा देणारे लोकप्रतिनिधी हवे होते. तर काहींना आपले शहर वा गावात विकासकामे होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात या बाबींना दुय्यम लेखत निवडणुकीनंतर सत्तेचे गणित जुळवण्यात आले. त्यात पक्षीय धोरणे, भूमिकांना तिलांजली देण्यात आली. प्रारंभी राष्ट्रवादी आणि भाजपची युती, त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडी आणि आता भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची युती असे प्रयोग करण्यात आलेत. यात मतदारांना गृहीत धरण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य मतदार संभ्रमावस्थेत असून या संभ्रमावस्थेचे रुपांतर नाराजीत होते आहे. त्यातून प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांच्या धोरणाविरोधात त्याचे मत तयार होऊ लागले आहे. प्रस्थापित पक्षांच्या या हीन दर्जाच्या राजकारणामुळे निर्माण झालेली ‘स्पेस’ भरुन काढण्याचे काम आम आदमी पक्षाच्या वतीने होत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरणे, ते तडीस नेणे आणि बरबटलेल्या राजकीय प्रथांना न शिवता स्वच्छ राजकारण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न या पक्षाकडून नाशिकमध्ये सुरू आहे. त्याची परिणीती म्हणजे नाशिकमधील प्रतिष्ठीत ‘आम आदमी’कडून महापालिका निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत.

पक्षाचे नेते जितेंद्र भावे आणि त्यांच्या समर्थकांनी ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीपासून जी उभारी घेतली तिच्यातील सातत्य आजतागायत टिकून ठेवले आहे. परंतु ‘मेरी आवाज सुनो’ हा भावेंचा स्वभाव असल्याचा दावा करत याच पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक कार्यकर्ते भावेंना नेताच मानायला तयार नाहीत. त्यामुळे चांगल्या चळवळीला छेद बसत आहे. वास्तविक, कोणत्याही पक्षाचा अजेंडा पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी कुणीतरी एका नेत्याचा स्वीकार करावा लागतो. अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था पक्षाची होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भावे यांनी सुरू केलेले काम आणि या कामाला जनतेतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघता आगामी महापालिका निवडणूक काबीज करायची असेल तर पक्षातील सर्वांनाच हेवेदावे विसरुन एकत्र यावे लागेल, अन्यथा एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता येणार नाही, असे बोलले जाते आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -