नामको हॉस्पिटलच्या रुग्णांना मिळणार प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी

गंभीर आजारांवरील उपचार शक्य, गरीब रुग्णांना दिलासा

नाशिक : शहरातील नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको हॉस्पिटलला रुग्णांच्या उपचारासाठी प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी संलग्नीकरणाला मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे गंभीर आजारांच्या रुग्णांना उपचारांसाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडून आर्थिक मदत मिळवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

कॅन्सर, थॅलेसेमिया, बोनमॅरो ट्रान्सप्लाट, किडनी ट्रान्सप्लाट अशा गंभीर आजारांच्या निवडक उपचारांवरील खर्चासाठी निवडक रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय दिव्यांग रुग्णांच्या उपचारासाठीही यातून निधी उपलब्ध होऊ शकेल. तसेच, कॅन्सर, बोन मॅरो ट्रान्स्प्लांटसाठी नऊ लाख रुपयांपर्यंत, किडनी ट्रान्सप्लांटसाठी तीन लाखांपर्यंत आणि इतर आजारांसाठी ५० हजारांपर्यंत निधीची तरतूद यात आहे.

नामको हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच महात्मा फुले जीवनदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, राज्य सरकारी कर्मचारी विमा योजना, धर्मादाय योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आमदार निधी रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सर्व योजना आणि निधीशिवाय प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा आधार आता रुग्णांना उपलब्ध झाला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खासदारांचे शिफारसपत्र, सर्व वैद्यकीय तपासण्या व उपचार ही कागदपत्रे, तसेच खर्चाचा अंदाज जोडून प्रधानमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बोनमॅरो ट्रान्सप्लांट सेंटरदेखील लवकरच रुग्णसेवेत दाखल होत आहे. हृदयरोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नामको हॉस्पिटलमध्ये कार्डियाक केअर सेंटरदेखील काही दिवसांत सुरू होणार आहे.

आर्थिक दूर्बल परिस्थितीमुळे अनेकदा रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागते, ही समाजातील विदारक स्थिती आहे. हीच बाब डोळ्यांसमोर ठेवत गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारे हे ब्रीद घेऊन या रुग्णालयाची सुरुवात झाली. आता विविध योजनांमुळे रुग्णांची परवडदेखील थांबणार आहे. सर्व विश्वस्त, तज्ज्ञ डॉक्टर आणि सरकारच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.

– डॉ. विशाखा जहागिरदार, रुग्णालय निरीक्षक, नामको हॉस्पिटल