५ रुपये भरा, बाजार करा

कोरोनाचा पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर पोलीस आणि महापालिकेकडून मेनरोड, सीटी सेंटर मॉलसह शहरातील भाजीबाजारांमध्ये एका व्यक्तीला एक तासांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांकडून ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे खर्चाची तयारी असेल तर घराबाहेर या, अन्यथा घरातच सुरक्षित थांबा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत ही मोहीम राबविली जाणार आहे. मेनरोडला असा मिळेल प्रवेश मेनरोड बाजारपेठेत जाण्यासाठी सेंट थॉमस चर्च, बादशाही कॉर्नर व धुमाळ पॉईंट येथून प्रवेश दिला जाईल आणि त्याच ठिकाणाहून बाहेर पडता येईल.

बाकीचे मार्ग बॅरेकेटिंगने बंद करण्यात आले आहेत. प्रवेश नसलेल्या परिसरात पोलिसांची पायी गस्त राहणार आहे. दररोज पोलीस कारवाईचा तपशील पोलीस नियंत्रण कक्षामार्फत पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांना सादर करणार आहेत. १५ एप्रिलपर्यंतही मोहीम राबवण्यात येणार आहे. पवननगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अशोकनगर, इंदिरानगर येथील कलानगर मार्केट, सीटी सेंटर मॉल, कृषी बाजार समिती, मेनरोड येथील बाजारपेठांमध्ये शुल्क आकारले जाणार आहे. स्थानिकांना आधारकार्ड दाखवून आत-बाहेर जाता येणार आहे. व्यवसायिकांना पासेस देण्यात येणार आहेत. गर्दी टाळणे व नियमांची अंबलबजावणी करण्यासाठी ही मोहिम राबवली जात असल्याचे सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी सांगितले.