प्रवीण पाटील नवे माध्यमिक शिक्षणाधिकारी

नाशिक : ठाणे येथील आदिवासी विकास विभागात सहायक शिक्षण आयुक्तपदी असलेले प्रवीण पाटील यांची नाशिकला माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम यांच्याकडून बुधवार (दि.2) रोजी पदभार स्विकारला. माध्यमिक शिक्षण विभागाला पाटील यांच्या रुपाने एका वर्षांनंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.

नाशिक येथे निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून प्रवीण पाटील यांनी 2018 ते 2022 पर्यंत कार्यभार सांभाळला. निरंतर शिक्षण विभाग बंद झाल्यानंतर त्यांची ठाणे येथे सहायक शिक्षण आयुक्तपदी बदली झाली. तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्च्छाव यांच्या कार्यकाळानंतर म्हणजेच मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 या काळात त्यांनी प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कारभार सांभाळला आहे. मुळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील रहिवासी असलेले पाटील यांनी बहुतांश काळ नाशिक जिल्ह्यात काम केल्यामुळे येथील भौगोलिक व शिक्षण विभागाची त्यांना माहिती आहे. त्याचा शिक्षण विभागाला अधिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. पदभार स्विकारल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक सुधीर पगार, सहायक प्रशासन अधिकारी राजेश जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम बोटे, विस्तार अधिकारी मनिषा पिंगळकर, एफ.डब्लू. चव्हाण, कनिष्ठ लेखाधिकारी राठोड, हगवणे आदी उपस्थित होते.

वर्षभरानंतर पूर्णवेळ अधिकारी तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर ऑगस्ट 2021 पासून या पदावर प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून चार व्यक्तिंनी काम केले. पुष्पावती पाटील, रामदास हराळ व डॉ.मच्छिंद्र कदम यांनी दोन वेळा या विभागाचा कार्यभार सांभाळला. एका वर्षांनंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.