घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत नाट्यगृहास विनाचर्चा मंजूरी

पंचवटीत नाट्यगृहास विनाचर्चा मंजूरी

Subscribe

प्रभाग क्रमांक १० च्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेकडे अंगुलीनिर्देश करत महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि. २०) झालेल्या महासभेत धोरणात्मक विषय तहकूब ठेवले, मात्र विकासकामांच्या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.

प्रभाग क्रमांक १० च्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेकडे अंगुलीनिर्देश करत महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि. २०) झालेल्या महासभेत धोरणात्मक विषय तहकूब ठेवले, मात्र विकासकामांच्या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचा फायदा उचलत महापौरांनी तब्बल पन्नास कोटींची कामे अवघ्या काही क्षणात विनाचर्चा मंजूर केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत सभागृहात महापौरांचा निषेध नोंदवला. महासभेनंतर आक्षेपाचे पत्र देत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. महत्वाचे म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष तथा पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या मतदारसंघात तब्बल २२ कोटी खर्चाचे नाट्यगृह बांधण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

या प्रकारामुळे महापालिकेतील अर्थकारणाचा वाद पेटला असून, विरोधीपक्षासह भाजपच्याच काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत आपल्याला जादा विषयांची यादी वा प्रस्ताव देण्यातच आले नसल्याचे सांगितले. दुसरीकडे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांनी महासभेला अंधारात ठेवून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र देण्यात आले. या बेकायदेशीर कामकाजाला विरोधक जबाबदार राहणार नाहीच, शिवाय आयुक्तांनीदेखील महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी केली आहे. मागणी करणार्‍यांमध्ये काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे गटनेते सलीम शेख, माजी महापौर अशोक मुर्तडक, अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा आदींचा समावेश आहे. नाशिक शहराचा विकास समोर ठेवून आपण महासभेत स्थायी समितीचे प्रस्ताव नियमाप्रमाणे मंजूर केल्याचे महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांना सांगितले. येत्या २५ जूनला पुढील महासभा होणार आहे. त्यात मिळकतींचे धोरण, धार्मिक स्थळे आदींबाबत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सभागृहनेता दिनकर पाटील यांनी सांगितले.

विनाचर्चा मंजूर प्रस्ताव असे…

  • पंचवटीत सहा एकर जागेत नाट्यगृह – २२ कोटी १९ लाख ३४ हजार
  • सातपूर क्लब हाउस परिसरात महिलांसाठी जलतरण तलाव – २ कोटी ५३ लाख
  • कोणार्कनगर येथे अभ्यासिका – ३६ लाख ९७ हजार
  • वडाळा येथील सर्वे क्रमांक ९७ मध्ये मार्केट व शॉपिंग सेंटर
  • गंगापूर येथे मलनिस्सारण केंद्र – ४३ लाख ९९ हजार
  • म्हसरूळ येथे अभ्यासिका – ३७ लाख २० हजार
  • वाघाडीनदीलगत लहान पूल – ३१ लाख ९३ हजार
  • प्रभाग क्रमांक १ मध्ये अभ्यासिका – ४७ लाख ३८ हजार
  • सातपूरला व्यायामशाळा व योगा हॉल – ३९ लाख ८२ हजार
  • सातपूरला विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका व वाचनालय – ४८ लाख ८२ हजार
  • संभाजी क्रीडा संकुलात स्पोर्ट अ‍ॅकॅडमी व प्रशिक्षण केंद्र – ४ कोटी ८५ लाख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -