घरमहाराष्ट्रनाशिक‘मुक्त’मध्ये लवकरच ’एमए योगशास्त्र’

‘मुक्त’मध्ये लवकरच ’एमए योगशास्त्र’

Subscribe

प्रस्ताव यूजीसीकडे, राज्यभरात पदविका अभ्यासक्रमाचे ४० केंद्र, घडवले १० हजार योगशिक्षक

शारीरिक आणि मानसिक संतुलनातून सर्वांगीण आरोग्य प्राप्त करून देणार्‍या योगशास्त्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून लवकरच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘डिप्लोमा इन योग टिचर’ला मिळणारा प्रतिसाद पाहता, बीए आणि एमए इन योगशास्त्र या दोन्हीही अभ्यासक्रमांचे प्रस्ताव यूजीसीकडे पाठवण्यात आले आहेत.

भारतामधील योगशास्त्राच्या समृद्ध जीवनशैलीचे महत्त्व जगभराला पटल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून योगाचे धडे घेणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र, मुक्त विद्यापीठाने तत्पूर्वीच अर्थात २००७-०८ पासून ’डिप्लोमा इन योग टिचर’ सुरू केला. सद्यस्थितीत राज्यभरात या अभ्यासक्रमाचे ४० केंद्र असून, त्यातून १ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच सेंटर्समधून गेल्या ११ वर्षांत तब्बल १० हजार ५०० हून अधिक योग शिक्षक बाहेर पडले आहेत. योगशिक्षकांची मागणी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांची गरज लक्षात घेता मुक्त विद्यापीठाने आता बीए योगशास्त्र आणि एमए योगशास्त्र हे दोन्हीही अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मंजुरीसाठी हे प्रस्ताव यूजीसी (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन) कडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील सेंटर्सद्वारे ते सुरू केले जाणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी दिली.

- Advertisement -

अभ्यासक्रमांची रुपरेषा अशी…

मुक्त विद्यापीठाच्या ’डिप्लोमा इन योगा टिचर’ला बारावीनंतर प्रवेश दिला जातो. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्य विद्यापीठांमध्ये थेट एमएला प्रवेश घेता येतो. मुक्तमध्येही अशीच रुपरेषा असेल. डिप्लोमामध्ये भारतीय आहारशास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र, योगसिद्धांत (योगशिक्षणशास्त्र) आणि शरीरक्रिया शास्त्र या चार विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजीतून परीक्षेचा पर्याय

महाराष्ट्रातील सर्वच केंद्रांवर ’डिप्लोमा इन योगशास्त्र’ करणार्‍या अमराठी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहेत. त्यातही भारतात शिक्षणासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. या विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांच्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून उत्तरे लिहिण्याचा पर्याय मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करुन दिला आहे.

- Advertisement -

भविष्यात परदेशातही सेंटर्स सुरू केले जातील

अनियमित आहार, अपुरी झोप, ताणतणाव यामुळे बिघडलेली जीवनशैली पूर्वपदावर आणायची असेल, तर योगशास्त्राशिवाय दुसरा प्रभावी पर्याय नाही. शारीरिक आणि मानसिक संतुलन होऊन यातून सर्वांगीण आरोग्य साधले जाते. म्हणूनच परदेशातूनदेखील केंद्रांची मागणी होते आहे. हे कोर्सेस ऑनलाईन झाल्यास भविष्यात परदेशातही सेंटर्स सुरू केले जातील. – डॉ. जयदीप निकम, संचालक, आरोग्य विज्ञान विद्याशाखा, मुक्त.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -