घरमहाराष्ट्रनाशिकराख्यांच्या बाजारातही पब्जीचे ‘आक्रमण’

राख्यांच्या बाजारातही पब्जीचे ‘आक्रमण’

Subscribe

एकीकडे लहानांसह मोठ्यांनाही वेड लावणार्‍या मोबाईलमधील पब्जी गेमने आता राख्यांतही आपले ‘मिशन कम्प्लिट’ करण्याचा धडाका सुरू केल्याचे दिसून येत आहे.

बालकांच्या मानसिकतेवर अतिशय विघातक परिणाम करणार्‍या पब्जी या मोबाईल गेमवर केंद्र सरकार बंदी आणण्याच्या विचारात असताना राख्यांच्या बाजारावर मात्र पब्जीचेच आक्रमण दिसून येत आहे. विशेष म्हणजे, राख्यांमध्ये सर्वाधिक मागणी ‘पब्जी’लाच आहे.

बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन दृढ करणार्‍या राखीपौर्णिमेसाठी शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून, विविधरंगी-आकर्षक राख्यांनी दुकाने सजलेली दिसून येत आहेत. यंदा या राख्यांतील आकर्षण म्हणजे लहानग्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या कार्टून्स आणि पब्जीच्या राख्या. अगदी दहा रुपयांपासून या विविध आकर्षक राख्या ग्राहकांना खास करून लहानग्यांना भुरळ पाडत आहे. एकीकडे लहानांसह मोठ्यांनाही वेड लावणार्‍या मोबाईलमधील पब्जी गेमने आता राख्यांतही आपले ‘मिशन कम्प्लिट’ करण्याचा धडाका सुरू केल्याचे दिसून येत आहे. या गेमची लोकप्रियता पाहता राख्या उत्पादक कंपन्यांनी यंदा अनेक वेगवेगळ्या आकारांतील पब्जी राख्या तयार केल्या आहेत. यात काही कागदी म्हणजेच पर्यावरणपूरक राख्यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

पब्जीसोबतच डोरेमॉन, छोटा भीम, शिवा, बालगणेशा, रोबोट बॉय वीर यांच्या राख्याही लहानग्यांना भुरळ घालत आहेत. यंदा मोठ्यांसाठीदेखील पब्जीच्या काही वेगळ्या राख्या विक्रीस आल्याचे दिसून आले.

कार्टून्सला मागणी

शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध कार्टून्सच्या राख्या विक्रीस आल्या आहेत. त्यांची किंमत १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुरुवारी रक्षाबंधन असल्याने आणि पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठांत उत्साह संचारल्याचे दिसून आले. यंदा कार्टून्ससोबतच कॅलिग्राफीतील विविध नावांच्या राख्याही आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज, गणपती, शिवशंकर यांच्याही राख्या उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -