गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संशयित मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल

Sexual abuse
प्रातिनिधिक फोटो

अभ्यासाच्या नोटस् देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेला डिसुजा रोड, जेलरोड येथील अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने २४ जून रोजी दुपारी नोट्स देण्याच्या बहाण्याने विठ्ठल मंगल कार्यालय, जुना सायखेडा रोड, जेलरोड येथील आपल्या घरी नेले. पाण्यातून गुंगीचे औषध दिल्यानंतर मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर मुलाने तिच्यावर बलात्कार केला. गुंगीतून बाहेर आल्यानंतर मुलीने आई-वडील बाहेरगावी गेलेले असल्याने, आपल्या मित्रांना घटनेबाबत पुसटशी कल्पना दिली. या प्रकाराने संतप्त मित्रांनी संशयित मुलाला मारहाण केली. यात गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.