आरक्षण जाहीर होताच पंचवटीत राजकीय वातावरण तापले

उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट वाटपावरून मोठा फटका बसण्याची शक्यता

स्वप्निल येवले । पंचवटी
नाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभागनिहाय आरक्षण सोडत सोमवारी जाहीर झाली आणि अनेकांचे प्रभागातील निवडणुकीचे गणित बदलले. पंचवटीत एकूण ८ प्रभाग असून २५ सदस्य निवडून द्यायचे आहे. पंचवटीतील प्रभाग एक ते सात हे तीन सदस्यीय असून प्रभाग आठ हा चार सदस्यांचा प्रभाग आहे. आज आरक्षण सोडतीत पंचवटीत अनुसूचित जाती करता एकमेव जागा सुटली असून अनुसूचित जमाती महिला राखीव ३ जागा, अनुसूचित जमातीसाठी २ जागा, सर्वसाधारण महिला राखीव ९ जागा तर सर्वसाधारण खुला करता १० जागा असे २५ जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. पंचवटीत यंदा भाजपला उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट वाटपावरून मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षण जाहीर झाल्याने पॅनल बनविण्यासाठी अनेक प्रभागात उमेदवारांचा शोध घेतला जाणार असल्याचे चित्र आहे. तर काही विद्यमान नगरसेवकांना आपल्या कुटुंबातील महिला निवडणूक रिंगणात उतरावाव्या लागणार आहेत.

आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक पंचवार्षिक निवडणुकींपासून प्रभागांवर असलेले पारंपरिक वर्चस्व यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर पंचवटीतील काही राजकीय व्यक्तींनी आजपर्यंत स्वतः नेतृत्व केलेलं असून घरातून कधीही महिला लढवलेली नाही. परंतु, आरक्षणामुळे कदाचित त्यांच्या कुटुंबातील महिला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळू शकतात. प्रभाग १ मध्ये अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला आणि खुला असे आरक्षण जाहीर झाले असल्याने खुला आणि सर्वसाधारण महिलांपेक्षा प्रभागातील अनुसूचित जमातीच्या जागेवर होणारी लढत चुरशीची असणार आहे. यात भाजपची उमेदवारी मिळविण्यापासून चुरस असणार असून भाजपात नव्याने दाखल झालेले माजी नगरसेवक जगन्नाथ तांदळे यांचे की विद्यमान नगरसेवक पुंडलिक खोडे यांचे पारडे जड ठरते, हे बघावे लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीला तिथे पाहिजे तसा उमेदवार हाताशी नसला तरी नवीन चेहेर्‍यांना संधी मिळू शकते. प्रभाग २ मध्येदेखील विद्यमान नगरसेवकांना इच्छुकांचे मोठे आव्हान समोर उभे झाले आहे.

दोन महिला आरक्षण असून यंदा माजी महापौर रंजना भानसी यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले हुकमी एक्के बाहेर काढण्याच्या तयारीत असून खुद्द भाजपतील एका माजी खासदारांची स्नुषादेखील येथून निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार यांना प्रवीण जाधव आणि विशाल कदम यांचे आव्हान असल्याने कदाचित आपल्या पत्नी माजी नगरसेविका शालिनी पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर सलग दोन वर्षे स्थायी समिती सभापती पदी निवडून आलेले गणेश गिते हे कोणत्या प्रभागातून उमेदवारी करतात, याकडे लक्ष लागलेले आहे. प्रभाग ३ येथे अनुसूचित जमातीचे एक आरक्षण पडले असल्याने तिथे गेल्या निवडणुकीत उमेदवारी केलेले शिवसेनेचे सिद्धेश्वर अंडे, भाजपकडून वैशाली सोनवणे हे चेहेरे असले तरी पॅनल कसे बनते त्यावर सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे. माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे तसेच माजी पंचवटी प्रभाग सभापती मच्छिन्द्र सानप यांचा प्रभाग क्रमांक ४ असून या मध्ये अनुसूचित जमातीचे महिला आणि सर्वसाधारण महिला असे दोन महिला आरक्षण पडले आहे. यात सुरेश खेताडे हे अनुसूचित जमातीच्या महिला जागेवरून आपल्या कुटुंबातील महिला सदस्य लढवतील अशी चर्चा आहे.

तर निमसे आणि सानप यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. प्रभाग ५ मध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेवकांमध्ये उमेदवारी मिळविण्यापासून संघर्ष होणार असून दोन सर्वसाधारण महिला राखीव जागेतून कुटुंबातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरावे लागेल. भाजपचे विद्यमान नगरसेविका प्रियंका माने, जगदीश पाटील, रुची कुंभारकर हे दावेदार असून पाटील आणि कुंभारकर यांच्यापैकी कोणा तरी एकाला महिला उमेदवार रिंगणात उतरवावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. तर शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका पूनम मोगरे याना पॅनलमध्ये सोबतीला तगडे साथीदार घ्यावे लागणार आहेत. तर भाजप आणि शिवसेनेला राष्ट्रवादीचे आव्हान असेल. या प्रभागात अपक्षांची संख्यादेखील मोठी असेल. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराची चिंता वाढेल. विद्यमान आमदार राहुल ढिकले यांचे निवासस्थान असलेला प्रभाग ६ सर्वधारण खुले दोन तर सर्वसाधारण महिला एक अशी आरक्षणे जाहीर झालेली असून भाजपच्या इच्छुकांमध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आता कस लागणार आहे.

यात विद्यमान नगरसेवक हेमंत शेट्टी हे प्रबळ दावेदार असेल तरी इच्छुकांमध्ये ढिकले समर्थकांची संख्यादेखील मोठी आहे. भाजपतील प्रत्येक इच्छूक उमेदवाराने अगोदरपासूनच आपल्या कुटुंबातील एक महिला सदस्य इच्छूक असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपतील नाराजांची तसेच बंडखोरांची साथ मिळाल्यास नवीन समीकरण बघायला मिळेल. प्रभाग ७ एकमेव प्रभाग आहे, जिथे अनुसूचित जातीचे आरक्षण पडले असून अनुसूचित जमातीचे महिला आरक्षण तर एक खुल्या गटातील आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत प्रभागात चारही नगरसेवक भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी यंदा राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांकडून भाजपला रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

अनुसूचित जातीतून स्वर्गवासी शांताबाई हिरे यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती लढणार असून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका कविता कर्डक, शिवसेनेकडून लक्ष्मी ताठे हे निवडणुकीच्या रिंगणात असून इतरही अनेक इच्छूक असले तरी अनुसूचित जमातीच्या महिला राखीव जागेसाठी भाजपच्या विद्यमान नगरसेविका सरिता सोनवणे यांच्या विरोधात सक्षम महिला उमेदवार इतर सर्वच पक्षांना शोधावी लागेल. प्रभाग ८ हा चार सदस्यांचा असून सर्वसाधारण दोन महिला राखीव आणि दोन सर्वसाधारण खुले असे आरक्षण पडले आहे. यात चारही जागेसाठी तीन विद्यमान नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरणार असून माजी नगरसेविका यांची स्नुषा ही चौथी उमेदवार असेल.