घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा मजूर संघात भोसलेंच्या रुपाने 'शिंदे गट-भाजप'चे वर्चस्व

जिल्हा मजूर संघात भोसलेंच्या रुपाने ‘शिंदे गट-भाजप’चे वर्चस्व

Subscribe

नाशिक : सहकार क्षेत्रातील नावाजलेली संस्था म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीत यंदा मालेगावचे संचालक तथा सहकार क्षेत्राचे तज्ज्ञ राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाला जोरदार धक्का बसेल असा अंदाज बांधला जात असताना त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या मदतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संघात भोसलेंच्या रुपाने शिंदे गटाने अध्यक्षपद तर उपाध्यक्षपद भाजपला मिळाले आहे.

जिल्हा मजूर संघ ही ठेकेदारांशी संबंधित शिखर संस्था आहे. यात आमदार, खासदारांसह नेत्यांची कामे करणार्‍या मंडळींचा वावर असल्याने त्याकडे राजकीय नेत्यांचेही लक्ष असते. गेल्या महिन्यात एकूण 20 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात 8 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 12 जागांसाठी जवळपास 56 उमेदवार रिंगणात उतरले होते. निवडणुकीत पॅनल तयार न करण्याची भूमिका जाहीर करत भोसलेंनी अनेक इच्छुकांचे दोर कापले. त्यामुळे निवडणुकीत या नाराजीचा त्यांना फटका बसला आणि आपल्या विरोधी गटातील उमेदवार निवडून आले.

- Advertisement -

संचालकांनी नाराजी कायम राहील आणि भोसलेंच्या वर्चस्वाला धक्का बसेल, असा अंदाज बांधत विरोधी गटाचे नेतृत्व माजी अध्यक्ष संपतराव सकाळे यांनी हाती घेतले. दोन्ही गटाकडे दहा संचालक असल्याने कुणाचे पारडे जड ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सकाळेंच्या गटाला माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेही पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा होती. पण निवड प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची ‘एन्ट्री’ झाली. त्यांच्याकडे असलेले दोन संचालक आणि भाजपचे केदा आहेर यांच्याकडील दोन संचालकांना सोबत घेवून दोन्ही गटाला झुलवत ठेवले. अखेरच्या क्षणी अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे देणार्‍या गटालाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. यात राजेंद्र भोसले गटाने त्यांची अट मान्य केली आणि भाबड हे अध्यक्षपदी विराजमान झाले. राजकीयदृष्टीकोनातून बघितले तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या संघात जवळपास 16 संचालक त्यांच्या पक्षाशी निगडीत आहेत. परंतु, केवळ चार संचालकांच्या बळावर शिंदे गट व भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवले, असेच दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -