घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रSpecial Report : 'खाबुगिरी'ला संधीच नसल्याने सहा महिन्यांपासून गॅस दाहिनी बंद

Special Report : ‘खाबुगिरी’ला संधीच नसल्याने सहा महिन्यांपासून गॅस दाहिनी बंद

Subscribe

नाशिक : प्रदूषण कमी करण्यासाठी स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार लाकडांऐवजी गॅस दाहिनीवर मोठ्या प्रमाणात होण्यास प्रवृत्त करणे गरजेचे असतांना; महापालिका प्रशासन मात्र या दाहिनीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पूर्व विभागातील गॅस दाहिनी बंद अवस्थेत आहे.

कोट्यवधींचे व्यवहार करणार्‍या प्रशासनाला अद्याप ती दुरुस्त करता आलेली नाही. लाकडाचा वापर करुन होणार्‍या अंत्यसंस्कारात ‘हात मारण्या’ला संधी असते. मात्र गॅस दाहिनी दुरुस्तीचे काम अवघे अडीच लाखांचेच असल्याने त्यात ‘खाबुगिरी’ला फारशी संधी नसते. त्यामुळेच प्रशासन गॅस दाहिनीकडे दुर्लक्ष करते का असा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -

महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत नऊ महिन्यांत लाकूड व तत्सम खरेदीवर तब्बल सव्वा कोटींचा खर्च झाला आहे. वीज वा गॅस दाहिनीचा अधिक वापर झाल्यास आर्थिक भार कमी होईल. शिवाय लाकडाचा वापर थांबून प्रदूषणाची पातळी कमी होईल या उद्देशाने पूर्व विभागातील स्मशानभूमित गॅस दाहिनी बसवण्यात आली आहे. या दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आता लोकही पुढे येत आहेत. म्हणजेच लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. मात्र महापालिकेच्या उदासिन कारभारामुळे लोकांना नाईलाजास्तव लाकडांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

बांधकामने दाखवले यांत्रिकीकडे बोट

गॅस दाहिनी बंद झाल्याची तक्रार संबंधितांनी १८ ऑगस्ट २०२२ ला, ९ नोव्हेंबर २०२२ तसेच ११ जानेवारी २०२३ ला बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली होती. मात्र बांधकाम विभाग यांत्रिकी विभागाकडे आणि यांत्रिकी विभाग बांधकामकडे बोट दाखवतो. महत्वाचे म्हणजे, गेल्यावेळी बांधकाम विभागाने २० लाख खर्च करुन दाहिनीची दुरुस्ती केली होती. आता मात्र संबंधित विभागही हात वर करीत आहे. या कामाला दुरुस्तीसाठी केवळ अडीच लाखांपर्यंतच खर्च येणार असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधींचे काम असते तर त्यातून मलिदा वरपण्याच्या उद्देशाने हे काम जलद गतीने झाले असते असेही बोलले जात आहे.

- Advertisement -
प्रदुषण वाढले तरी चालेल…

लाकडाचे सरण रचून केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांमुळे धुलीकण व वायू उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अलीकडेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), ऊर्जा व संसाधन संस्था (टेरी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या सहकार्याने झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. असे असतानाही किरकोळ कारणावरुन गॅस दाहिनी बंद असल्याने महापालिका प्रशासनाला प्रदूषणाशी आणि नागरिकांच्या जीवाशी काही देणेघेणेच नाही, अशी नाराजीची प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींकडून दिली जात आहे.

याची करावी लागणार दुरुस्ती
  • दाहिनीत मृतदेह ज्यावर ठेवतात तो पट्टा सैल झाला आहे
  • दाहिनीत पाणी शिरते
  • पाईपलाईनमधून गॅसची गळती होते
  • ट्रॉलिचा रोलर व्यवस्थित फिरत नाही
  • दरवाजा बंद होत नाही
  • बर्नर व्यवस्थित पेटत नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -