दगडफेक, नागरिकांवर हल्ले, तोडफोड; नवीन नाशकात “एटीएम कट्टा” गॅंगची दहशत

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी आटोक्याबाहेर जात असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (दि.२) रात्री १२ वाजेच्या सुमारास उदय कॉलनी तोरणानगर भागात दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच मद्यपी टवाळखोरांनी घरांवर दगडफेक करुन दुचाकी वाहने रस्त्यावर पाडून नुकसान केली. त्यानंतर टवाळखोरांच्या घरात घुसून नागरिकांना मारहाण केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबडमधील तोरणानगरमध्ये गुरुवारी (दि.२) रात्री बारा वाजेदरम्यान दुचाकी वाहनावरून चार ते पाच टवाळखोर आले. उदयकॉलनी, तोरणानगर येथील चौकांमध्ये रहिवासी घरांजवळ शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. टवाळखोरांनी घरासमोरील व रस्त्याजवळची दुचाकी गाड्यांची तोडफोड करत घरांवर दगडफेक केली. यावेळी मद्यपींना हटकण्यासाठी गेलेल्या प्रवीण घोरपडे यांना घरात घुसून दगडफेक करत मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, पोलीस वाहनाचा आवाज येताच तवाळखोरांनी पळ काढला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एटीएम कट्टा गँगची दहशत

गेल्या वर्षभरापासून तोरणानगर व उदय कॉलनी परिसरात एटीएम कट्टा गँगने दहशत माजवली आहे. या गँगमधील गावगुंड तोरणानगर भागातील मनपाच्या मैदानावर सातत्याने मद्यपान करण्यास जमतात. यावेळी त्यांच्याकडून नागरिकांना शिवीगाळ व मारहाण करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला जातो. मागील चार ते पाच महिन्यापूर्वी देखील या गुंडांनी घरात घुसून एका कुटुंबाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण परिसरात या गुंडांकडून अजूनही दहशत माजवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीपोटी नागरिक तक्रार करायला धजावत नसून, पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.