Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र गोदाकाठी धुमाकूळ घालणारा 'तो' बिबट्या अखेर जेरबंद

गोदाकाठी धुमाकूळ घालणारा ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

Subscribe

नाशिक : निफाड तालुक्यातील पूर्व भागातील म्हाळसाकोरे व मांजरगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात निफाड वनविभागाच्या अधिकार्‍यांना सोमवारी (दि. ७) यश आले. मात्र अजून दोन बछडे परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

बिबट्या जेरबंद झाल्याने समाधान व्यक्त होत असले तरी, मात्र मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत परिसरातील अनेक कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, गाय, वासरी, बैल, कोंबड्या आदिंना आपले भक्ष्य केले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. निफाडच्या दक्षिणेकडील गोदाकाठ भाग हा नेहमी बिबट्यांचा केंद्रबिंदू म्हणून राहिला आहे. जवळच गोदावरी नदीचे मुबलक पाणी जास्त प्रमाणावर असलेले उसाचे क्षेत्र, मका, द्राक्ष्याच्या बागा तसेच महत्वाचे म्हणजे या भागात असणारे पक्षी अभयारण्य आणि जंगली परिसर यामुळे बिबट्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

- Advertisement -

येथील शेतकरी विनायक सोनवणे यांना त्यांच्या वस्तीवर शेडमध्ये बिबट्या निदर्शनास पडला. तेव्हा त्यांनी ट्रॅक्टरवरून बिबट्याचा फोटो मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आणि सदर माहिती तात्काळ वनविभागाला दिली. माजी सरपंच पंडित आनंदा सोनवणे यांच्या मागणी वरून त्यांच्या शेतात गट.नं. ९३१ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. पहाटे बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती पंडित सोनवणे यांनी निफाड वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवली. यावेळी मुख्यवनाधिकारी अक्षय मेहत्रे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान जाधव, अत्याधुनिक बचाव पथक (रेसक्यू टीम) निफाड यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला निफाडच्या रोपवाटिका केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी करून बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येईल, असे उपस्थित अधिकार्‍यांनी सांगितले.

जुन्या घटनेची आठवण कायम

मागील तीन महिन्या पूर्वी ह्याच भागातील मुरकुटे वस्तीवर शेतमजुराच्या मुलावर हल्ला करून बिबट्याने ठार केल्याने हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. त्यानंतर अनेक जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. बिबट्याचे दर्शन झाले कि, परिसरातील नागरिकांना मागील घटनेची आठवण होते.

तीन महिन्यात चार बिबटे जेरबंद
- Advertisement -

गोदावरीच गोदाकाठ भागात नेहमीच बिबटे आपले वास्तव्य करतात. अनेकदा संपूर्ण कुटुंब येथील शेतकर्‍यांच्या नजरेस पडले आहे. परिणामी येथे नेहमी बिबट्याचे हल्ले होत असतात. पिंजरे लावले जातात त्यात गेल्या तीन महिन्यांत म्हाळसाकोरेत दोन, भुसे येथे एक तर मांजरगाव येथे एक असे चार बिबटे जेबंद झाले आहे.

- Advertisment -