गट आणि गणांची रचना आयोगाला सादर, पुढील प्रक्रियेस सुरवात

निवडणूक आयोग लोकसंख्या, भौगोलिक रचना तपासणार

Nashik District

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देताच निवडणूक विभागाने कामकाज सुरु केले आहे. जिल्ह्यातील एकूण ८४ गटांचा प्रारुप आराखडा तातडीने मागवत त्याची पडताळणी सुरु केली आहे. नाशिकच्या चार तहसीलदारांनी निवडणूक आयोगापुढे ही माहिती शुक्रवारी (दि.६) सादर केली.

जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समित्यांच्या गण रचनेत यंदा बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एकूण ८४ गट निर्माण झाले आहेत. त्यांचा प्रारुप आराखडा निवडणूक शाखेने शुक्रवारी सादर केला. यात नव्याने गट निर्माण करताना आवश्यक भौगोलिक रचना, हद, गूगल मॅप यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने गट, गण रचना करण्यापूर्वी दिलेले नियम व निकष पाळण्यात आले आहेत का? याची पडताळणी आता केली जात आहे. गटांचा प्रारुप आराखडा सादर केल्यानंतर तीन ते चार दिवस या माहितीची पडताळणी केली जाईल. जेणेकरुन आराखडा जाहीर झाल्यानंतर त्यावर कमीत कमी हरकती नोंदवल्या जातील, यादृष्टीने आयोगाने प्रेरणा काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक विभागाने सादर केलेल्या विकास आराखड्याची पडताळणी झाल्यानंतर त्यातील त्रुटी दुरुस्त केल्या जातील. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचा प्रारुप आराखडा सादर झाल्यानंतर एकत्रितपणे त्याची घोषणा केली जाईल. साधरणत: १५ दिवसांत जिल्हा परिषदांचा प्रारुप आराखडा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रारुप आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी साधारणत: १५ दिवसांची मुदत दिली जाईल. आलेल्या हरकती निकाली काढण्यासाठी आयोगातर्फे स्वतंत्ररित्या तारीख जाहीर केली जाते. त्यानुसार जूनमहिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन आरखडा अंतिम होईल.

आदेशाची प्रतीक्षा

आयोगाने गट, गण रचनेबाबत पुढील कोणतेही आदेश प्रशासनाला दिलेले नाही. त्यामुळे पुढील नेमके काय आदेश येतात याची प्रतिक्षा आता लागली आहे. राज्य निवडणुक आयोगाने रखडलेल्या जिल्हा परिषद गट, गणांचा प्रारूप आराखडा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आयोगाने शुक्रवारी तातडीने जिल्हा प्रशासनातील अधिकाजयांना मुंबईत पाचारण केले होते.