Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक महामार्ग बसस्टँडचे लवकरच पालटणार रुपडे; मॉल, शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट आदींची होणार उभारणी

महामार्ग बसस्टँडचे लवकरच पालटणार रुपडे; मॉल, शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट आदींची होणार उभारणी

Subscribe

नाशिक : शहरातील मुंबई नाका परिसरातील महामार्ग बसस्थानकाचे लवकरच पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्वावर विकास होणार आहे. त्यात प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, मॉल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, प्रवाशांसाठी वेटिंग रुम, स्वच्छतागृह अशा सोयीसुविधांचा समावेश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

मुंबई-पुण्यातील प्रवाशांना नाशिकमध्ये घेऊन येणार्‍या बसेस महामार्ग बसस्थानकात येतात. मात्र, सद्यस्थितीत या स्थानकाची अवस्था अत्यंत बिकट आहे. यामुळे नाशिकची प्रतिमा खराब होते. या पार्श्वभूमीवर बसस्थानकाचे आधुनिकीकरण व्हावे या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी महामंडळाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली. या बसस्थानकाच्या विकासासाठी महामंडळ सकारात्मक असून, लवकरच पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर विकास केला जाणार आहे. यात महामंडळाचे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, मॉल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, प्रवाशांसाठी वातानुकूलित वेटिंग रूम, स्वच्छतागृह अशा विविध सुविधांचा समावेश आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात राज्यभरातून बसने दररोज सुमारे २० हजार प्रवाशी येत असतात. महामार्ग बसस्टँड आधुनिकीकरण व्हावे यासाठी शहरातील नागरिक तसेच, विविध सामाजिक संस्थांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत खासदार गोडसे यांनी पराग जैन यांची भेट घेतली. महामार्ग बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी तयार केलेले डिझाईनवजा नकाशा त्यांनी गोडसे सादर केला. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीकडून विकास शक्य असल्याचे खा. गोडसे यांनी जैन यांच्या निदर्शनास आणून दिले. जैन यांना गोडसे यांचा प्रस्ताव भावल्याने त्यांनी सकारात्मकता दर्शविली.

६ वर्षांनंतरही मेळा स्थानकाचे काम संपेना

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या मेळा बसस्थानकाचा हायटेक टर्मिनल रुपाने विकास सुरू आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीतून हा कायापालट होणार असल्याने तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. १० प्लॅटफॉर्म असलेल्या या अत्याधुनिक बसस्थानकाचे काम सुरू होऊन ६ वर्षे लोटली तरीही ते अद्याप संपलेले नाही. एका प्लॅटफॉर्मवर दोन बसेस उभ्या राहतील, अशी मोकळी जागा या स्थानकात आहे. बाहेरून येणार्‍या बसेसना जिल्हा बँकेच्या जुन्या मुख्यालयासमोरील असलेल्या मार्गावरून प्रवेश असेल. तर, बाहेर पडण्यासाठी ठक्कर बाजार मध्यवर्ती बसस्थानकाचा सध्याचा मार्ग उपयोगात आणला जाणार आहे. तर प्रवाशांसाठी शरणपूर मार्गाकडील पद्मा हॉटेललगत असलेल्या प्रवेशद्वाराचा उपयोग करता येईल. त्याचबरोबर बालसुधारगृहालगतच्या भागातूनही नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मार्ग असेल. अशा विविध सुविधा असलेल्या मेळा बसस्थानकाच्या प्रकल्पाची उभारणी नेमकी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या बसस्थानकाच्या शेजारीच असलेले नवीन सीबीएस बसस्थानक भव्य दिसत असले तरीही त्यात प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंगचा विचारच केलेला नाही. त्यामुळे समोरील संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा पार्किंग आणि कोंडीचा प्रश्न बिकट बनलेला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -