घरमहाराष्ट्रनाशिकअतिक्रमण निर्मूलन विभागाच्या ढिसाळ कारभारावरुन खरडपट्टी

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या ढिसाळ कारभारावरुन खरडपट्टी

Subscribe

प्रभारी आयुक्तांनी घेतली तातडीची बैठक, कारभार सुधारण्याची अधिकार्‍यांना दिली ताकीद

भाजीविक्रेत्या महिलेच्या पतीकडे पालिका कर्मचार्‍याने लाच मागितल्याचे कॉल रेकॉर्डिंग आणि अतिक्रमणांची बजबजपुरी यावरुन पालिकेचे प्रभारी आयुक्त तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली.  या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने शुक्रवारी (दि.१२) सकाळी याबाबत राजीव गांधी भवनात अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात प्रभारी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या उपायुक्तांना कारभारात सुधारणा करण्याची ताकीद दिली.

नाशिक शहराच्या प्रत्येक मुख्य चौक व रस्त्यांना अतिक्रमणांचा फास पडला आहे. विशेषतः नगरसेवकांचा कालावधी संपूण प्रशासकीय राजवट लागल्यानंतर शहरभरात अतिक्रमणांची संख्या दुप्पट झाली आहे. एवढे होऊनही अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. या विभागाकडून एखादी कारवाई झाली तरीही ती अत्यंत किरकोळ स्वरुपात केली जाते. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढून शहराचा बकालपणा वाढला आहे.

- Advertisement -

शहराला स्मार्ट करण्याच्या नादात नाशिककरांचे हक्काचे फुटपाथ पार्किंग, हॉकर्स आणि व्यावसायिकांना आंदण देत सर्वसामान्य पादचार्‍यांचा जीव धोक्यात घालण्याचा उद्योग महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या अशा धोरणामुळेच शरणपूर रोड, सीबीएस, शालिमार, छत्रपती शिवाजी रोड, टिळक पथ, रविवार कारंजा, मेनरोड, एम.जी.रोड या मध्यवर्ती भागासह सर्वच ठिकाणचे पादचारी मार्ग अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे नाशिककरांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते आहे.

पार्किंगवरुन महापालिका अधिकारी या अव्यवस्थेला पोलिसांकडे बोट दाखवत असले तरीही नाशिककरांवर ही कोंडीची वेळ पालिकेच्या नगररचना विभागाच्या अनागोंदीमुळे आली आहे. त्यामुळेच शहरभरात वाहने रस्त्यावर आणि पार्किंगमध्ये व्यवसाय अशी परिस्थिती आहे. मूळात व्यावसायिक संकुलांना परवानगी देताना पार्किंगसाठी पुरेशी जागा ठेवण्याचा नियम आहे. त्याशिवाय इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच मिळत नाही. नाशिकमध्ये मात्र या दाखल्याशिवाय इमारती बिनदिक्कतपणे उभ्या आहेत.

- Advertisement -

महापालिकेत सर्वच विभाग प्रमुखांची बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. शहरातील अतिक्रमणांचाही विषय या बैठकीत होता. त्यावरुन संबंधित अधिकार्‍यांना कार्यपद्धतीबाबत ताकीद दिली.
– राधाकृष्ण गमे, प्रभारी आयुक्त, महापालिका, विभागीय आयुक्त

अधिकारी स्तरावरुन आम्ही प्रभावीपणे काम करत असतो. मात्र, अनेकदा कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. त्यातून गैरसमजही निर्माण होतात. मात्र, यापुढे अशा कर्मचार्‍यांची अजिबात गय केली जाणार नाही. कारण, अशा कर्मचार्‍यांमुळे पालिकेची प्रतिमा खराब होते, तसेच आमच्यासारख्या अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. कर्मचार्‍यांच्या बाबतीत आम्ही अंतर्गत पातळीवर लवकरच मोठा निर्णय घेणार आहोत.
– करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका

त्या कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई

पंचवटीच्या निलगिरी बागेतील अतिक्रमणे हटविताना जप्त केलेले साहित्य परत देण्यासाठी थेट आर्थिक तडजोडीची मागणी करतानाच भाजीविक्रेत्या महिलेच्या पतीला धमकी देणार्‍या महापालिका कर्मचार्‍याची उपायुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. पंचवटीचे विभागीय अधिकारी कॉल रेकॉर्डिंग, मोबाईल क्रमांक आणि नावावरुन कर्मचार्‍याची ओळख निश्चित करत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यावर थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

या उपाययोजना करा

  • विभागातील प्रत्यक्ष कारवाईला जाणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची तातडीने बदली करा
  • नव्याने अतिक्रमणे झाल्यास किंवा असलेली अतिक्रमणे न काढल्यास त्याची जबाबदारी थेट विभागीय अधिकार्‍यांवर निश्चित करा
  • मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अतिक्रमणधारकांवर थेट गुन्हे दाखल करा
  • उपायुक्तांनी स्वतः आठवड्यातून किमान एकदा प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घ्यावा
  • अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वाहनांचा माग काढण्यासाठी जीपीएस लावा
  • कोणतीही मोहीम नसताना या विभागातील कर्मचार्‍यांना अन्य विभागांत वर्ग करा
  • अतिक्रमण निर्मूलन विभागातून राजकीय नेत्यांच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना तातडीने बाहेरचा रस्ता दाखवा
  • झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना हात न लावता केवळ व्यावसायिक अतिक्रमणे (दुकाने, टपर्‍या), दोन-चार मजली इमारती प्राधान्याने हटवा
  • अन्य विभागांशी समन्वय ठेवून शहरातील हॉकर्स आणि हॉकर्स झोन निश्चित करा
  • हॉकर्स झोनशिवाय इतरत्र बसणार्‍या अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करावी
  • हजेरी लावल्यानंतर दिवसभर वाहनांमध्ये जाऊन आराम करणार्‍या कर्मचार्‍यांवरील कामाच्या जबाबदार्‍या वाढवाव्यात
  • शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकांमधील अतिक्रमणांचा तातडीने बिमोड करा
  • नैसर्गिक नाले, उद्याने, पालिकेच्या जागा, सरकारी जागा यावरील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करुन त्यावरील अतिक्रमणे काढावीत. त्यानंतर या जागांना संरक्षक कुंपन घाला.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -