घरमहाराष्ट्रनाशिकपोलिसांनी घेतले ‘सिव्हिल’च्या वैद्यकीय अधिकार्‍यांचे जबाब

पोलिसांनी घेतले ‘सिव्हिल’च्या वैद्यकीय अधिकार्‍यांचे जबाब

Subscribe

२५ लाख खंडणीप्रकरण

नाशिक :जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांविरोधातील गैरव्यवहाराच्या तक्रारी मागे घेण्यासाठी एका युवकाने २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि भांडारपाल यांचे चौकशी जबाब घेतले असून, लवकरच जिल्हा शल्यचिकित्सकांचेही जबाब घेतले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात कोण दोषी आढळून येते, याकडे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेससह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा रुग्णालयात अनेक गैरव्यवहार सुरु आहेत, अशा आशयाच्या एका सामाजिक संघटनेचे संशयित बापूसाहेब चव्हाण यांनी लेटर हेडवर अर्ज करत गैरव्यवहाराच्या तक्रारी जिल्हाधिकारी, उपसंचालक आणि आरोग्य मंत्र्यांकडे धमकी दिल्याची माहिती दिली आहे.
 या तक्रारी मागे घेण्यासाठी सटाणा येथील सामाजिक संघटनेच्या कथित संशयित सदस्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची भेट घेत तडजोडीसाठी तब्बल २५ लाखांची मागणी केल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. तक्रारदार मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, भांडारपाल प्रशांत जोशी, वरिष्ठ लिपिक गहिनीनाथ जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. या अर्जात संशयित बापूसाहेब चव्हाण हे एका सामाजिक संघटनेचे सदस्य आहेत. काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तथ्यहीन तक्रार करत आहेत.
तडजोड म्हणून पैशांची मागणी करत आहे. पैशांची पूर्तता न केल्यास जिल्हाधिकारी, उपसंचालक, आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी करण्याची धमकी देत आहेत. या प्रकारामुळे शासकीय कामात अडचण निर्माण होत असून, या खोट्या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणीची मागणी करत आहे. याप्रकरणी संशयित व्यक्तीची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तक्रारीत म्हटले आहे. गैरव्यवराचे आरोप खरे की खोटे आहेत, हे शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

वर्चस्वातून असावी तक्रार 

 जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरव्यवहाराची माहिती संशयित बापूसाहेब चव्हाण यांना माहिती देणारा व्यक्ती रुग्णालयातील आहेत, असे चर्चा सिव्हिल वर्तुळात सुरु आहे. कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने विविध उपाययोजना सुरु केल्या. पहिल्या लाटेत मालेगावी कोरोनाचा विस्फोट झाला होता. मालेगाव नाशिक ग्रामीण पोलिसांसह जिल्हा यंत्रणा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. तरीही, मालेगावी कोरोना नियंत्रणात येत नव्हता.त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्‍यांची मालेगावी नियुक्ती केली. सुदैवाने मालेगावी कोरोना नियंत्रणात आला. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याचे कौतुक केले. ही बाब जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळेच नाराज वैद्यकीय अधिकार्‍याने संशयित चव्हाण यांना पुढे केले असावे. शिवाय, निनावी पत्र वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. चव्हाण आणि निनावी पत्रांचा आशय एकच असल्याची चर्चा सुरु आहे. जिरावाजिरवीच्या राजकारणात मात्र आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, अशीही चर्चा सिव्हिल वर्तुळात सुरु आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -