घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररस्ता सुरक्षा समितीची चार वर्षांपासून बैठकच नाही

रस्ता सुरक्षा समितीची चार वर्षांपासून बैठकच नाही

Subscribe

अपघात रोखण्यासाठी पालिकेचा जंक्शनवर उड्डाणपूलाचा प्रस्ताव

नाशिक : नांदुर नाक्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या बस दुर्घटनेनंतर रस्त्यांची दूरवस्था, ब्लॅक्स स्पॉट्सवरील उपाययोजनांकडे झालेली डोळेझाक, सरकारी यंत्रणांची उदासीनता समोर आली. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रस्ते दूरवस्थेप्रश्नी चर्चा करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांनीही सूचना मांडल्या. महापालिका हद्दीतून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांवर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव यावेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मांडला. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिले. नाशिकमध्ये शनिवारी झालेल्या बस दुर्घटनेचे पडसाद सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. रस्ते दूरवस्था आणि ब्लॅक स्पॉटप्रश्नी उपाययोजना आखण्याची जबाबदारी असलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठकच तब्बल चार वर्षांपासून झाली नसल्याची धक्कादायक बाब या बैठकीतून समोर आली. ही बैठक झाली असती तर अपघाताच्या ठिकाणी उपाययोजना होऊन अपघात टाळता आला असता, असा सूरही या बैठकीतून उमटला.

नाशिक शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाला रिंगरोड जोडले असल्याने शहरातील वाहतूक आणि शहरातून इतर जिल्ह्यांत जाणारी वाहतूक यांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. नांदूर नाक्यावरील घटना ताजी असतानाच कळवण येथे रविवारी झालेल्या रस्ते अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी संबधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केली. याबाबत काय कारवाई केली, असा जाब पालकमंत्री भुसे यांनी संबधित यंत्रणांना विचारताच अधिकारी निरूत्तर झाले. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण न करणे आणि अपघातास जबाबदार धरून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

- Advertisement -

इगतपुरी घोटी जंक्शनवरील रखडलेल्या रस्ते कामाबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी मुद्दा उपस्थित केला. केवळ बैठकीपुरतेच या विषयाचे गांभीर्य राहते. मात्र, नंतर यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने अजून किती जणांचे बळी घेणार, असा सवालही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. नांदूर नाक्यावरील घटनेच्या पार्श्वभुमीवर शहरासह जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले की, नाशिक महापालिका हद्दीत १५ ब्लॅक स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी गतीरोधक बसवणे, फलक लावणे यांसारख्या तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, परिवहन महामंडळ, महापालिका, शहर वाहतूक शाखा, बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी एकत्रित बैठक घेऊन ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी कोणत्या दूरगामी उपाययोजना करता येतील याचा आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -