घरमहाराष्ट्रनाशिकअडीच हजार आरोग्य कर्मचार्‍यांचे वेतन रखडले

अडीच हजार आरोग्य कर्मचार्‍यांचे वेतन रखडले

Subscribe

एक-दोन दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

नाशिक जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागांतर्गत काम करणारे परिचर, शिपाई या वर्ग तीनच्या अडीच हजार कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. आस्थापना विभाग आणि बँकेतील अडचणींमुळे सलग दुसर्‍या महिन्यात कर्मचार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे गेल्या पाच महिन्यांपासून मासिक वेतन रखडले आहे. वेतन मिळत नसल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यापाठोपाठ आता आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे वेतन दोन महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. मार्च महिन्याचे वेतन एप्रिलच्या शेवटी मिळाले, तर एप्रिल महिन्याचे वेतन आता मे संपण्यावर आला आहे तरी वेतन मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून काही कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तक्रार केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे यांनी या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे विचारणा केली असता डीबीटी प्रणाली बंद असल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन रखडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होऊन कर्मचार्‍यांना वेतन मिळणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मार्च महिन्याचे वेतन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मिळाले होते. आस्थापना विभागाचे कर्मचारी वेळेवर माहिती देत नसल्यामुळे हा वेळ जात असल्याचे या विभागातील कर्मचार्‍यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

एक-दोन दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होईल

स्टेट बँक ऑफ इंडियाची डीबीटी प्रणाली बंद असल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार असून त्यानंतर कर्मचार्‍यांना वेतन मिळेल. येत्या महिन्यात अशी समस्या उद्भवणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. – डॉ. विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -