घरमहाराष्ट्रनाशिकमाहिती पुस्तिकेअभावी अकरावीचे प्रवेश रखडले

माहिती पुस्तिकेअभावी अकरावीचे प्रवेश रखडले

Subscribe

जूनमध्ये पहिल्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया; निकालासोबत अर्ज भरण्यासाठी होणार धावपळ

नाशिक शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकांचे काम रखडल्याने प्रवेश प्रक्रियेला बाधा निर्माण झाली आहे. मे अखेरपर्यंत पुस्तिकांची छपाई पूर्ण करून जूनमध्ये त्यांचे वाटप होणार असल्याने निकालानंतरच प्रवेश सुरू होतील.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ९ मे रोजी रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली असली, तरी अद्याप माहिती पुस्तिकेची छपाई करण्यात आलेली नाही. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी गेल्यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून घेण्यासाठी शहरातील विविध शाळांना ४ मे रोजी माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे १० मेपासूून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांची विक्री सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण केला होता. अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी केवळ महाविद्यालयांचे पर्याय, अभ्यासक्रमाची शाखा, महाविद्यालय निवडण्याचे काम शिल्लक होते. तसेच, अकरावीची प्रवेश प्रक्रिया १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी मिळाली असली, तरी अगदी शेवटच्या टप्यात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेसाठी तयारी करता आली नाही. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित होते.

- Advertisement -

शहरातील जागा
शहरात ४३ अनुदानित महाविद्यालये, ४ विनाअनुदानित आणि १३ स्वयंअर्थसहाय्य महाविद्यालये आहेत. यात कला शाखेच्या एकूण ४ हजार ८००, विज्ञान शाखेसाठी ९ हजार ५४०, वाणिज्य शाखेसाठी ७ हजार ७६० तर कम्प्युटर सायन्ससाठी ५६० अशा एकूण २२ हजार ६०७ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय एमसीव्हीसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सुमारे ४६० जागा असून या सर्व जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -