घरताज्या घडामोडीपिकअप चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या

पिकअप चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Subscribe

मुंबई-आग्रा महामार्गावरुन जाणार्‍या मालवाहू गाड्या अडवून त्यांची लूट करणार्‍या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. संशयीत गोरख अशोक गांगुर्डे (रा.सोमवार हट्टी, चांदवड), सुनील गोविंद डगळे (रा.खेडगाव, ता.दिंडोरी), रोहित जयराम गांगुर्डे (रा.औताळे, ता.दिंडोरी), निरंजन तुळशीराम मंगळे (रा.ओझर टाऊनशिप, ता.निफाड) यांना पोलिसांनी मालेगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या संशयितांकडून 13 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई येथील नारायणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या पिकअप (एमएच 15 जीव्ही 5437) या गाडीतून राज्यासह देशातील सिमावर्ती भागात मालवाहतूक केली जाते. 18 जानेवारी 20 रोजी गाडीचे चालक कृष्णकुमार सिंग चंद्रसेठसिंग (रा.सुलतानपुर, उत्तरप्रदेश) हे नाशिकहून धुळ्याकडे जात होते. पहाटेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील टेहरे गावाच्या शिवारात अज्ञात चौघांनी पिकअप गाडीला सिल्व्हर रंगाची मारुती व्हॅन आडवी लावून चालकाच्या डोक्याला छर्‍याची बंदुक लावत मारहाण केली. चालकाच्या ताब्यातील पिकअप गाडी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा पाच लाख 60 हजारांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाने खेडगाव (ता.दिंडोरी) परिसरातून संशयित आरोपींना ताब्यात घेतले

ड्रायव्हरच ’मास्टर माईंड’

- Advertisement -

संशयित आरोपी गोरख गांगुर्डे व सुनील डगळे हे दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतकर्‍यांचा माल बाजारात विक्री करण्यासाठी पिकअपवर चालक म्हणून काम करत होते. या दोघांनी पिकअप व्हॅन चोरण्याचा कट रचला. 18 जानेवारी रोजी आरोपींनी ओझर येथील निरंजन मंगळे यांची मारुती व्हॅनमध्ये टेहरे येथे जाऊन एक पिकअप व्हॅन आडवली. चालकाच्या डोक्याला बंदुक लावून गाडीसह रोख रक्कम लंपास केली. स्पेअर पार्ट विकण्याचा कट शिजत असताना पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -