श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे कार्य प्रेरणादायी

गर्भवती महिला, कुपोषित बालकांसाठी राज्यभर मल्टी व्हिटॅमिन-आरोग्य सेवा मोफत उपक्रमास प्रारंभ

इगतपुरी : कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानने सुरु केलेला उपक्रम अतिशय उपयुक्त असून यामुळे अनेक महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सर्वांच्या सहभागाने कुपोषण मुक्त भारत होण्यासाठी आपण समाजाला प्रभावी दिशा देणारी चळवळ उभी करायला हवी. आपली भावी पिढी सदृढ निर्माण होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजगतेने ह्या उपक्रमात झोकून देऊन काम करावे. आमच्या आशाताई, नर्सेस, अंगणवाडी ताई, डॉक्टर्स आणि अनेक कोरोना योद्ध्यांनी संकटकाळापासून आतापर्यंत केलेल्या कामाचा हिमालय पाहून मला विशेष आनंद होतो आहे. ह्या सर्वांचे मी विशेष कौतुक करते असे प्रतिपादन भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्यूट त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्यामार्फत गर्भवती महिला व कुपोषित बालकांकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर मल्टी व्हिटॅमिन व काही आरोग्य सेवा मोफत दिल्या जाणार आहे. त्यानुसार कुपोषणमुक्त भारत अभियानांतर्गत माता व बाल संगोपन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. ह्या प्रकल्पाचा शुभारंभ इगतपुरी तालुक्यातून करण्यात आला. यावेळी ना. डॉ. पवार बोलत होत्या. मंत्री पवार यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या हस्ते विविध मातांना व्हिटॅमिन आणि इतर पूरक औषधे वाटप करण्यात आली. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचालित विवेकानंद इन्स्टिट्यूट त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष स्वामी कंठानंद आपल्या प्रभावी भाषणात म्हणाले की, आमच्यामार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संन्यासी व्यक्तीने जागरूकतेने देश पुढे नेण्यासाठी कटीबद्ध व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. महिलांच्या गर्भामध्ये चेतना निर्मित होऊन महापुरुषांना जन्म देऊन राष्ट्र घडवावे. नाशिक ही रामभूमी, सीताभूमी आणि शबरी यांची भूमी असून व्यापक हेतू ठेवून उन्नत व्हावे. तरच चैतन्य जागे होऊ शकते.

संस्थानचे सरचिटणीस स्वामी विश्वरूपानंद व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जिल्हानेते पांडुरंग बर्‍हे, अण्णा डोंगरे, संघटनमंत्री सुनील बच्छाव, नगरसेविका साबेरा पवार, कैलास कस्तुरे, अण्णा पवार, शरद कासार, किरण फलटणकर, सीमा झोले, जगन भगत, भाजयुमोचे रवी गव्हाणे, योगेश चांदवडकर, मयूर परदेशी, महेश शहाणे, चेतन जोशी, रोहन दगडे, आदित्य निखळे, सागर हांडोरे, वैशाली आडके, तानाजी जाधव, रमेश निसरड, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकाऱी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, सहाय्य्क बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. विश्वनाथ खतेले, संदीप कुयटे आदी उपस्थित होते.